कोबी खाल्ल्याने घटतो कॅन्सर आणि लठ्ठपणा | पुढारी

कोबी खाल्ल्याने घटतो कॅन्सर आणि लठ्ठपणा

नवी दिल्ली :

कोबी ही एक जगभरात सर्वत्र खाल्ली जाणारी भाजी आहे. जगातील बहुतेक देशांत कोबीचे उत्पादन घेतले जाते. आतापर्यंत करण्यात आलेल्या अनेक संशोधनांमध्ये ‘कोबी’ ही आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्‍त असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भाजीबाबत करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार कोबीचे नियमितपणे सेवन केल्यास कॅन्सरसह अनेक आजारांचा धोका कमी करण्यास मदत मिळते.

कोबीमुळे कॅन्सरसारखा गंभीर आजारापासून बचाव करण्यास मदत मिळते. याबरोबरच कोबी ही हृदयासाठी, पचनशक्‍ती वाढवण्यासाठी, तसेच वजन कमी करण्यासाठी फारच उपयुक्‍त ठरते. कोबीत कमी कॅलरीज असतात आणि न्यूट्रिएंटस् मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय यामध्ये प्रोटिन, फोएलेट, पोटॅशियम आणि मॅग्‍नेशियम हे घटक भरपूर प्रमाणात आढळतात.

कोबीत फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे पचनासाठी फारच उपयुक्‍त ठरते. याशिवाय यामध्ये ब्रॅसिनीन हे तत्त्व असून ते कॅन्सरविरुद्ध क्रिमोप्रिव्हेंटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटी दाखविते. यामध्ये ल्यूटिन आणि जेक्सेथीन हे घटक असून त्यामुळे डोळे कमजोर होण्यापासून वाचतात. नियमितपणे कोबीचे सेवन केल्याने वजन घटण्यास मदत मिळते. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागत नाही. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

Back to top button