दुग्धजन्य पदार्थांमुळे हाडे बनतात बळकट | पुढारी

दुग्धजन्य पदार्थांमुळे हाडे बनतात बळकट

वॉशिंग्टन :

दुधात इतके सारे पोषक तत्त्व असतात की, त्यामुळेच त्याला पूर्ण आहार म्हणून ओळखले जाते. शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने केलेल्या नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार कॅल्सियम आणि प्रोटिनचा भरणा असलेले दूध आणि दही, तसेच पनीर यासारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे वयस्कांमध्ये हाडे फ्रॅक्‍चर होण्याचा धोका कमी होतो. वृद्धाश्रमात राहणार्‍या वयस्कांवर करण्यात आलेले हे संशोधन ‘द बीएमजे’मध्येे (ब्रिटिश मेडिकल जर्नल) प्रसिद्ध करण्यात आले आहे.

संशोधनातील माहितीनुसार असे म्हटले जाते की, वृद्धाश्रमात राहणार्‍या लोकांना कॅल्सियम आणि प्रोटिनसारखे घटक कमी प्रमाणात मिळतात. यामुळे तेथील वयस्कांची हाडे कमकुवत बनून ती फ्रॅक्‍चर होण्याचा धोका बळावतो.

संशोधन काळातील 2 वर्षांत संशोधकांनी ऑस्ट्रेलियातील 60 वृद्धाश्रमांचा अभ्यास केला. यामध्ये 7,197 वयस्कांपैकी 72 टक्के महिला होत्या. या सर्वांचे वय सरासरी 86 होते. या सर्वांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण संतुलित होते. मात्र, कॅल्सियम आणि प्रोटिनचे प्रमाण तुलनेत कमी होते. त्यानंतर वृद्धाश्रमात राहणार्‍या 30 वयस्कांना प्रमाणापेक्षा जास्त दूध, दही, पनीर व अन्य दुग्धपदार्थ देण्यात आले. अन्य वयस्कांना हे सर्व नेहमीप्रमाणे देण्यात आले. ज्या वयस्कांना जास्त प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ देण्यात आले होते, इतरांच्या तुलनेत त्यांच्यात सर्व प्रकारच्या फ्रॅक्‍चरमध्ये 23 टक्के घट झाल्याचे निदर्शनास आले.

उतारवयात आापले आरोग्य आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी वयस्क लोकांनी दूध आणि दह्याबरोबरच अन्य दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करण्यास प्राधान्य द्यावे. शरीर आणखी तंदुरुस्त बनण्यास मदत मिळते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

Back to top button