

प्राग : तब्बल 6,000 वर्षांपूर्वी आजच्या चेक प्रजासत्ताकच्या भूमीवर एका अत्यंत खडतर परिस्थितीत खाणीत काम करणार्या दोन सख्ख्या बहिणी कशा दिसत असतील, याचा उलगडा संशोधकांनी केला आहे. या बहिणींच्या चेहर्यांच्या दोन ‘अति-वास्तववादी’ 3-D प्रतिकृती शास्त्रज्ञांनी जगासमोर आणल्या आहेत.
ही थक्क करणारी पुनर्रचना त्या बहिणींच्या अवशेषांच्या नवीन विश्लेषणावर आधारित आहे. त्यांचे सांगाडे 15 वर्षांपूर्वी दक्षिण मोरावियन प्रदेशातील एका प्राचीन ‘चर्ट’ नावाच्या दगडाच्या खाणीत सापडले होते. नवीन पुराव्यांनुसार, या दोन्ही बहिणी त्या खाणीत हत्यारे आणि शस्त्रे बनवण्यासाठी लागणारे जड दगड काढण्याचे काम करत असत. ‘आर्किओलॉजिकल अँड अँथ्राेपॉलॉजिकल सायन्सेस’ या जर्नलमध्ये हा नवीन अभ्यास प्रकाशित झाला आहे. या दोन्ही बहिणींना खाणीतील एका उभ्या खड्ड्यात एकावर एक दफन करण्यात आले होते.
यापैकी लहान बहिणीचा सांगाडा जमिनीखाली 20 फूट (6 मीटर) खोल सापडला, तर मोठ्या बहिणीचा सांगाडा तिच्या 3 फूट (1 मीटर) खाली आढळून आला. या अभ्यासाचे सहलेखक आणि मोरावियन संग्रहालयाचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ मार्टिन ओलिवा यांच्या मते, ‘त्या तिथेच काम करत असल्यामुळे त्यांना त्याच ठिकाणी दफन केले गेले असावे.’ संशोधकांना त्यांच्या सांगाड्यांवर कोणत्याही हिंसक मृत्यूच्या किंवा आजाराच्या खुणा आढळल्या नाहीत. मात्र, ओलिवा यांनी सांगितले की, ‘दुखापतींमुळे त्या काम करण्यास असमर्थ ठरल्यावर त्यांची बळी म्हणून हत्या केली गेली असावी किंवा त्यांना मारून टाकण्यात आले असावे, ही शक्यता नाकारता येत नाही.’