

कोपनहेगन : डेन्मार्कच्या किनारपट्टीवर पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मध्ययुगीन काळातील एका महाकाय जहाजाचे अवशेष सापडले आहेत. हे जहाज कॉग प्रकारातील असून ते 1400 च्या दशकातील आहे. या जहाजाला स्वालगेट 2 असे नाव देण्यात आले आहे. हे जहाज 28 मीटर लांब, 9 मीटर रुंद आणि 6 मीटर उंच आहे. हे जहाज सुमारे 300 टन माल वाहून नेण्यास सक्षम होते. कॉग ही मध्ययुगातील सर्वात महत्त्वाची मालवाहू जहाजे होती. हे आतापर्यंत सापडलेले जगातील सर्वात मोठे कॉग जहाज आहे.
समुद्र तळामध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञांना शोध घेत असताना स्वालगेट 2 या जहाजाचे अवशेष सापडले. त्यामध्ये आढळलेल्या काही खास गोष्टी या जहाजाच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकतात. जहाजाच्या मागील बाजूस लाकडापासून बनवलेले एक सुरक्षित छत सापडले आहे. त्याला स्टर्न कॅसल असे म्हणतात. जहाजाच्या अशा रचनेचे पुरावे रेखाचित्रांमध्ये असायचे, पण प्रत्यक्ष अवशेषांच्या रूपात ते पहिल्यांदाच सापडले जहाजावर विटांनी बांधलेले स्वयंपाकघर आढळले आहे. त्या काळी समुद्रात गरम जेवण बनवण्याची ही प्रगत सोय पाहून शास्त्रज्ञ थक्क झाले आहेत. जहाजावर लाकडी ताट, शूज, कंगवा, जपमाळ आणि स्वयंपाकाची पितळी भांडी सापडली आहेत. यावरून त्या काळातील खलाशांच्या जीवनाची माहिती मिळते. हे जहाज समुद्रात 13 मीटर खोलीवर वाळूखाली गाडले गेले होते, त्यामुळे लाकूड आणि दोरखंड अजूनही चांगल्या स्थितीत आहेत.
उत्खनन प्रमुख ऑट्टो उल्डम यांच्या मते, हा शोध सागरी पुरातत्त्वशास्त्रातील एक मैलाचा दगड आहे. यावरून कळून येते की 14 व्या शतकातच तंत्रज्ञान इतके प्रगत झाले होते की, इतकी मोठी जहाजे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी वापरली जात होती. हे जहाज नेदरलडस्मध्ये बांधले गेले असावे असा अंदाज आहे.