

लंडन : स्कॉटलंडमधील हौशी मेटल डिटेक्टरिस्टस्ना 600 वर्षे जुना सोन्या-चांदीच्या नाण्यांचा खजिना सापडला आहे, ज्याला ते ‘आयुष्यभरात एकदाच मिळणारा शोध‘ असे संबोधत आहेत. कीथ यंग आणि लिसा स्टीफनसन यांनी स्कॉटिश बॉर्डर्स प्रदेशातील कॅपरक्लूच गावाजवळ हा दुर्मीळ खजिना शोधला. सुरुवातीला, त्यांना 15व्या शतकातील स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये तयार केलेली एकूण 30 नाणी मिळाली. ‘हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शोध आहे,’ असे स्टीफनसन यांनी स्कॉटलंडच्या क्राऊन ऑफिस आणि प्रोक्युरेटर फिस्कल सर्व्हिसच्या निवेदनात सांगितले.
या खजिन्यात इंग्लंडच्या हेन—ी पाचवा (राज्यकाल : 1413-1422) आणि एडवर्ड चौथा (राज्यकाल : 1461-1483) यांनी बनवलेली चांदीची ग्रोट नाणी होती. तसेच, स्कॉटलंडच्या जेम्स पहिला (राज्यकाल : 1406-1437) आणि जेम्स दुसरा (राज्यकाल : 1437-1460) यांनी बनवलेली सोन्याची डेमी आणि हाफ-डेमी नाणी सापडली. या नाण्यांवर त्यावेळच्या राजांचे चेहरे कोरलेले आहेत. ग्रोट हे मोठे चांदीचे नाणे प्रथम एडवर्ड पहिल्याने 1279 मध्ये इंग्लंडमध्ये सादर केले होते आणि त्याची किंमत चार पेन्स होती. स्कॉटलंडमधील सोन्याचे डेमी नाणे फ—ेंच शब्द
‘वाळशी’ वरून घेतले आहे, ज्याचा अर्थ ‘अर्धा’ असा होतो. याचे मूल्य सुमारे नऊ शिलिंग होते. हाफ-डेमी हे त्याचे लहान रूप असून त्याची किंमत सुमारे 4.5 शिलिंग होती. कीथ यंग आणि लिसा स्टीफनसन यांनी हा खजिना सापडताच स्कॉटिश ट्रेझर ट्रोव्ह युनिटला अहवाल दिला. हा युनिट देशभरातील पुरातत्त्वीय शोधांचा तपास करते. प्राथमिक तपासणीत असे दिसून आले की ही नाणी 1460 च्या दशकाच्या सुरुवातीस किंवा मध्यात येथे ठेवली गेली असावीत. यानंतर, पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या ठिकाणी आणखी पाच नाणी शोधून काढली, त्यामुळे एकूण नाण्यांची संख्या 35 झाली आहे.