इस्रायलच्या नेगेव्ह वाळवंटात 2500 वर्षांपूर्वीचे सांगाडे | पुढारी

इस्रायलच्या नेगेव्ह वाळवंटात 2500 वर्षांपूर्वीचे सांगाडे

तेल अवीव ः इस्रायलच्या पुरातत्त्व संशोधकांनी दक्षिण इस्रायलमधील नेगेव्ह वाळवंटाच्या मध्यभागी तब्बल 2500 वर्षांपूर्वीचे किमान 50 मानवी सांगाडे शोधले आहेत. हे सांगाडे त्या काळात विक्री करण्यात आलेल्या गुलाम महिलांचे असावेत असे संशोधकांना वाटते. याठिकाणी दोन मोठी थडगी असून त्यामध्ये हे सांगाडे होते.

हे ठिकाण त्या काळातील व्यापारी वाहतुकीच्या मार्गावर होते. या मार्गावरून विविध संस्कृतीच्या देशांमधून मालाची वाहतूक होत असे. व्यापारांचे तांडे या मार्गावरून ये-जा करीत असत. तिथे पाण्याच्या पाईपलाईनसाठी उत्खनन करीत असताना या दफनभूमीचा शोध लागला. याठिकाणी 23 फूट लांब व 23 फूट रुंदीचा एक कक्ष तसेच 15 फूट लांब व 15 फूट रुंदीचा आणखी एक कक्ष आढळला. हे ठिकाणही लक्षणीय असेच आहे. आतापर्यंत या भागात अशा स्वरूपाची थडगी सापडली नव्हती आणि ती कोणत्याही वसाहतीशी निगडीत नाहीत असे संशोधकांनी म्हटले आहे. प्राचीन काळी अशा मार्गांवर हिंसाचार किंवा रोगराई ही एक सामान्य बाब होती. गाझा किंवा इजिप्तमध्ये खरेदी केलेल्या महिलांचे हे अवशेष असावेत असे संशोधकांना वाटते.

Back to top button