टोरांटो : चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायम करणे महत्त्वाचे असते. परंतु चाळीशीनंतर चालणे, वॉर्म अप, योगासन असा व्यायाम अनेक जण करतात. परंतु वयाच्या साठीत कुणी 1,575 पुश-अप्स तासाभरात काढू शकतो का? यावर तुमचे उत्तर नाही असणार आहे. परंतु कॅनडामधील 59 वर्षीय डोनाजीन वाइल्ड यांनी हा विक्रम केला आहे. त्यांचे वय केवळ संख्येने वाढले आहे. परंतु त्यांचे शरीर युवकांना मागे टाकणारे आहे. डोनाजीन यांनी आजी होण्याच्या वयात गिनीज वर्ल्ड रिकॉर्डस्मध्ये नाव नोंदवले आहे. त्यांनी तासाभरात 1,575 पुश-अप करण्याचा विक्रम केला आहे.
डोनाजीन यांनी मार्चमध्ये केलेल्या त्यांच्या मागील विक्रमानंतर आता नवीन विक्रम केला आहे. मार्च महिन्यात त्यांनी 4 तास 30 मिनिटे आणि 11 सेकंद प्लँक स्थितीत राहून जगाला चकित केले होते. आता पुश-अपसाठी विशेष मानके पाळली गेली. प्रत्येक पुश-अपसाठी कोपर 90 अंशांपर्यंत वाकवणे आणि नंतर हात पूर्णपणे सरळ करणे आवश्यक आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्मधील दोन पंचांनी त्याची गणना केली. त्यानंतर त्यांचे पुश-अप स्कोअरबोर्डवर सतत अद्ययावतही केले. डोनाजीन यांनी पहिल्या 20 मिनिटांत 620 पुश-अप मारले. त्यानंतर त्यांनी 15 मिनिटांसाठी 20 आणि 5 पुश-अपचे सेट पुन्हा केले. सरतेशेवटी त्यांनी प्रति सेट सरासरी 10 पुश-अपसह जुना विक्रम मोडला. डोनाजीन यांची 11 आणि 12 वर्षांची नातवंडे यांनी त्यांना त्यासाठी सतत प्रोत्साहन दिले. त्यांचा विक्रम पूर्ण होताच त्या नातवंडानी त्यांच्या नावाचा जयजयकार केली. डोनाजीन यांनी सांगितले की, मला माझे अश्रू थांबवून माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागले. मला वाटले की मी आणखी पुश-अप करू शकतो. पुश-अप ही युवकांसाठी चांगला व्यायम आहे. परंतु वरिष्ठ नागरिक हा प्रकार फारसा करत नाही. पुश-अपमुळे चेस्ट, खांदे आणि ट्रायसेप्सचे मसल्स मजबूत होतात. तसेच कोर मसल्स सक्रिय असतात. त्यामुळे शरीरातील बॅलेन्स चांगला राहतो. हृदयाची स्पंदने वाढतात. आरोग्यात सुधारणा होते. आता डोनाजीन वाइल्ड यांनी कोणत्याही गोष्टीला वयाची मर्यादा नसते, हे सिद्ध करून दिले आहे.