भारतीय वंशाच्या देव शाहने जिंकली ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा | पुढारी

भारतीय वंशाच्या देव शाहने जिंकली ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा

वॉशिंग्टन ः भारतीय वंशाच्या अनेक मुलांनी आजपर्यंत अमेरिकेतील प्रतिष्ठित स्पेलिंग बी स्पर्धा जिंकलेली आहे. आताही पुन्हा एकदा एका भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने या स्पर्धेत आपला डंका वाजवला आहे. चौदा वर्षांच्या देव शाह या मुलाने ही प्रतिष्ठित स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा 2023 जिंकली. त्याने अकरा अक्षरांच्या ‘सॅमोफाईल’ या शब्दाचे स्पेलिंग अचूक सांगितले. त्याला 50 हजार डॉलर्सचे रोख बक्षीस मिळाले.

देव याने यापूर्वी 2019 आणि 2021 मधील स्पर्धांमध्येही सहभाग घेतला होता. आता तो या स्पर्धेचा 95 वा चॅम्पिपयन बनला आहे. तो आपल्या कुटुंबासमवेत फ्लोरिडात राहतो. अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात झालेल्या या स्पर्धेनंतर त्याने हे जणू काही स्वप्नच आहे, अशा शब्दात आपली प्रतिक्रिया दिली. अमेरिकेच्या व्हर्जिनियामधील चौदा वर्षांच्या शार्लोट वॉल्शने या स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 1 कोटी 10 लाख स्पर्धकांमधून अकरा फायनलिस्ट सहभागी झाले होते. गेल्यावर्षी ही स्पर्धा टेक्सासमध्ये आठवीत शिकणार्‍या मूळ भारतीय वंशाच्या हरिणी लोगन या विद्यार्थिनीने जिंकली होती.

Back to top button