‘डार्क मॅटर’ पासून बनलेल्या दुर्मीळ तार्‍याचा शोध? | पुढारी

‘डार्क मॅटर’ पासून बनलेल्या दुर्मीळ तार्‍याचा शोध?

वॉशिंग्टन ः एका दूरस्थ सौरमंडळात खगोलशास्त्रज्ञांना ‘डार्क मॅटर’ पासून बनलेल्या तार्‍याची चिन्हे दिसून आली आहेत. अत्यंत दुर्मीळ अशा डार्क मॅटर स्टारचे हे पहिलेवहिले पुरावे असू शकतात. एक तारा कृष्णविवराभोवती फिरत आहे असा आधी संशोधकांचा समज झालेला होता. मात्र, हा तारा कृष्णविवराभोवती फिरत नसून तो डार्क मॅटरपासून बनलेल्या ‘बोसॉन स्टार’ भोवती फिरत असल्याचा दावा काही संशोधकांनी केला आहे.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या गैया सॅटेलाईटच्या सहाय्याने या सौरमंडळाचा शोध घेण्यात आला होता. एक तारा कृष्णविवराभोवती फिरत असल्याचे त्यामध्ये दिसून आले होते. मात्र, दोन खगोलशास्त्रज्ञांनी आता अशा दाव्याला आव्हान दिले आहे. कदाचित या ठिकाणी यापूर्वी पाहण्यात न आलेला वेगळा तारा असू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. हा तारा म्हणजे अद़ृश्य डार्क मॅटरने बनलेला तारा असावा असे त्यांना वाटते. अर्थात याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे. या स्टार सिस्टीममध्ये एक सूर्यासारखा तारा असून अन्य जे काही आहे त्याबाबत खात्री नाही. या तार्‍याचे वस्तुमान सूर्यापेक्षा थोडे कमी आहे. त्याच्या रहस्यमय सोबत्याचे वस्तुमान सुमारे 11 सोलर मासेस इतके आहे. हे दोन्ही खगोल एकमेकांभोवती 1.4 अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनिटस् अंतरावरून प्रदक्षिणा करतात.

सूर्य आणि मंगळ यांच्यादरम्यान इतकेच अंतर आहे. त्यांची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी 188 दिवस लागतात. काहींना वाटते हा ‘डार्क’ सोबती म्हणजे एक कृष्णविवर आहे. शक्तिशाली तार्‍यांचा मृत्यू झाला की अशी प्रचंड आकर्षण शक्ती असलेली कृष्णविवरे बनत असतात. मात्र, एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे की कदाचित डार्क मॅटरचे कण एकत्र येऊन बनलेला हा अनोखा तारा असावा. ‘डार्क मॅटर’ हे असे अद़ृश्य कण आहेत जे प्रत्येक आकाशगंगेला व्यापून राहिलेले आहेत. त्यांच्याबाबत अत्यंत कमी माहिती विज्ञानाला आहे. कदाचित ते बोसॉन कणांचेच एक वेगळे रूप असावे असेही म्हटले जाते.

 

Back to top button