कसा बनला होता कोळसा? | पुढारी

कसा बनला होता कोळसा?

नवी दिल्ली : चीनमध्ये सध्या अनेक वीज प्रकल्प संकटात सापडले आहेत आणि त्याचे कारण आहे कोळसा. कोळशावर चालणारे हे प्रकल्प कोळशाच्या पुरवठ्याअभावी संकटात सापडले असल्याने चीनला वीजटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक देशांमध्ये अशी स्थिती निर्माण होऊ शकते. सध्याच्या काळातही कोळशाचे असे महत्त्व आहे! तीस कोटी वर्षांपूर्वी कोळसा बनला व तो आजही विविध कारणांसाठी वापरला जात आहे.

सुमारे तीस कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या सखल पाणथळ भागांमध्ये घनदाट जंगले होती. पुरासारख्या काही नैसर्गिक आपत्तींमुळे जंगलांमधील झाडे मातीखाली गाडली गेली. जसे जसे हे जंगल दाबले गेले तसा तापमान आणि दाबही वाढू लागला. ऑक्सिजनची कमतरता आणि आम्लांचा त्यांच्यावर परिणाम होऊ लागला. कालौघात त्यांच्यामधील ऑक्सिजन आणि हायड्रोजन निघून गेले व कार्बनचे प्रमाण वाढले.

अशा प्रकारे वनस्पतींपासून जमिनीतील दबाव व उष्णतेने ‘कार्बनीकरण’ होऊन कोळसा बनला. लिग्नाईट, सब-बिटुमिनस, बिटुमिनस आणि अँथ—ासाईट असे कोळशाचे चार प्रकार आहेत. लिग्नाईट कोळसा काळा नसून तो करड्या रंगाचा असतो. त्यामध्ये 25 ते 30 टक्के कार्बन असते. या कोळशात आर्द्रता अधिक असते आणि ऊर्जा कमी असते. या लिग्नाईटचा विद्युत प्रकल्पांमध्ये वीजनिर्मितीसाठी वापर होतो. सब-बिटुमिनस कोळसा करड्या किंवा काळ्या रंगाचा असतो. त्यामध्ये 35 ते 45 टक्के कार्बन असते.

ऑस्ट्रेलियात हा कोळसा आढळतो. त्याचाही वीजप्रकल्पांमध्ये वापर केला जातो. बिटुमिनस कोळसा काळ्या रंगाचा असतो व त्यामध्ये 45 ते 80 टक्के कार्बन असते. तो अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण करतो. त्याचा वापर वीजनिर्मितीसाठी तसेच लोखंड, अ‍ॅल्युमिनियम, स्टील, कोक आणि सिमेंटच्या उत्पादनासाठीही होतो. अँथ—ासाईट कोळशाचा रंग गडद काळा असतो व त्यामध्ये 80 ते 98 टक्के कार्बन असतो. या चमकदार कोळशाचा वापर घरगुती वापरासाठी होतो. त्याच्यामध्ये धूर कमी आणि ऊर्जा अधिक असते. कोळसा उत्पादनाबाबत जगात अमेरिका, चीन व भारत हे देश पहिल्या तीन स्थानांवर आहेत.

Back to top button