Ancient Bladder Stone | कांस्ययुगीन थडग्यात ५,३०० वर्षे जुना द्राक्षाच्या आकाराचा मूतखडा

 Ancient Bladder Stone |
Ancient Bladder Stone | कांस्ययुगीन थडग्यात ५,३०० वर्षे जुना द्राक्षाच्या आकाराचा मूतखडा
Published on: 
Updated on: 

मॉस्को : एका नवीन अध्ययनानुसार, काळ्या समुद्राजवळ एका भव्य थडग्यात पुरलेल्या कांस्ययुगीन पुरुषाचा मृत्यू ५,००० वर्षांहून अधिक काळापूर्वी मुत्राशयाच्या संसर्गाच्या (UTI) गुंतागुंतीमुळे झाला असावा. पुरातत्त्व शास्त्रज्ञांना त्या पुरुषाच्या थडग्यामध्ये मूतखड्याचा द्राक्षाएवढा आकार असलेला अवशेष सापडला आहे.

रशियाच्या लोमोनोसोव्ह मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीच्या मानववंश शास्त्रज्ञ आणि या अभ्यासाच्या मुख्य लेखक नताशा बेरेझिना यांनी सांगितले, "तो दीर्घकाळ चाललेल्या जुनाट युरोजेनिटल (लघवी व जननेंद्रियाच्या) संसर्गाने त्रस्त होता." त्या म्हणाल्या, "ही कोणतीही क्षुल्लक किंवा तात्पुरती गोष्ट नव्हती. त्याचे शेवटचे काही वर्षे तीव्र आणि सततच्या वेदनांनी भरलेले असावेत." बेरेझिना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नैऋत्य रशियातील स्ताव्रोपोल अप्लँड प्रदेशातील प्रारंभिक कांस्ययुगीन दफनभूमीत सापडलेल्या एका छोट्या, दगडासारख्या वस्तूचे संशोधन केले. त्यांचे हे संशोधन ३० सप्टेंबर रोजी 'आर्किऑलॉजिकल अँड अँथ्रोपॉलाजिकल सायन्सेस' या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. ही कबर एका 'कुर्गान' दफनभूमीचा भाग होती.

कुर्गान ही एक प्राचीन स्टेपी (कुरण) दफन परंपरा होती, ज्यामध्ये कबरीवर मातीचा मोठा ढिगारा तयार केला जात होता. पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी जेव्हा या ढिगाऱ्याचे उत्खनन केले, तेव्हा त्यांना तिथे एक भुयारी कबर (Catacomb) आढळली. त्यामध्ये एका पुरुषाचा सांगाडा होता, जो सुमारे ५,३०० वर्षांपूर्वी मृत पावला तेव्हा अंदाजे चाळीशीत असावा. संशोधकांना त्या पुरुषाच्या पेल्विसजवळ (कमरेच्या भागाजवळ) एक चकमकीच्या दगडाचे (Flint) बाणाचे टोक आढळले. सांगाड्याचे उत्खनन केल्यानंतर प्रयोगशाळेत केलेल्या विश्लेषणादरम्यान, संशोधकांच्या असे लक्षात आले की, हाताच्या हाडांच्या संग्रहात एक विचित्र दगडासारखी वस्तू आहे. तपकिरी रंगाची ही वस्तू गोलाकार असून, तिला अनेक कंगोरे होते.

तिचा व्यास सुमारे ०.८ इंच (२.१ सेंटीमीटर) इतका होता, जो साधारणपणे एका द्राक्षाच्या आकाराएवढा होता. त्या वस्तूवरील एका लहान तडाखातून आतमध्ये स्फटिकासारखी रचना असल्याचे दिसून आले. या छोट्या वस्तू कशापासून बनल्या आहेत हे शोधण्यासाठी, संशोधकांनी अनेक विश्लेषणात्मक पद्धतींचा वापर केला. सर्वप्रथम, एक्स-रे फ्लूरोसेन्स विश्लेषणातून असे उघड झाले की, या वस्तूचे मुख्य घटक कॅल्शियम आणि फॉस्फरस आहेत. त्यानंतर स्फटिक संरचना ओळखण्यासाठी त्यांनी एक्स-रे पावडर विवर्तन विश्लेषणाचा वापर केला. त्यानंतर हा मूतखडा असल्याचे निष्पन्न झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.