

कैरो : इजिप्तच्या नाईल नदीच्या काठावर सापडलेल्या एका प्राचीन कोरीव कामाने संपूर्ण जगातील इतिहासकारांचे आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. दगडावर कोरलेले हे चित्र तब्बल 5,100 वर्षे जुने, म्हणजेच इजिप्तच्या पहिल्या राजवंशाच्या सुरुवातीच्या काळातील असू शकते, असा दावा एका नवीन अभ्यासात करण्यात आला आहे. या शोधामुळे प्राचीन इजिप्तच्या निर्मितीच्या अज्ञात इतिहासावर प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे कोरीवकाम अस्वान शहराजवळ नाईल नदीच्या पश्चिम किनार्यावर सापडले आहे. यामध्ये एक बोट कोरलेली असून, त्यात एक व्यक्ती बसलेली दिसते. जरी त्या व्यक्तीचे फक्त डोके आणि उजवा खांदा दिसत असला, तरी ती राजघराण्यातील सदस्य असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. या चित्राची शैली प्रोटोडायनॅस्टिक (राजवंशपूर्व) आणि पहिल्या राजवंशाच्या सुरुवातीच्या काळातील इतर कोरीव कामांशी मिळतीजुळती आहे. विशेष म्हणजे, हा कालखंड पुरातत्त्वशास्त्रज्ञांसाठी आजही एक गूढ आहे. त्यामुळे हे नवीन कोरीवकाम इजिप्शियन राज्याच्या स्थापनेबद्दलचे महत्त्वपूर्ण धागेदोरे देऊ शकते, असे या अभ्यासात म्हटले आहे.
‘अॅन्टिक्विटी’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, या चित्रामध्ये ‘एका सुशोभित बोटीला पाच व्यक्ती उजवीकडे ओढत आहेत’ असे दिसते. बोटीच्या मागच्या बाजूला एक व्यक्ती वल्हं घेऊन उभी आहे. त्याच्या शेजारी एक बंदिस्त जागा (कदाचित केबिन) असून, त्यात एक व्यक्ती बसलेली आहे. अभ्यासाचे लेखक आणि बेल्जियममधील ‘म्यूझी डू मालग्रे-टाऊट’ संग्रहालयाचे संचालक डोरियन व्हॅनहुले यांनी लिहिले आहे की, ‘बसलेल्या व्यक्तीची हनुवटी लांब दाखवण्यात आली आहे, जे पहिल्या राजवंशापासून राजांनी परिधान केलेल्या खोट्या दाढीचे प्रतीक असू शकते.
सुरुवातीच्या शासकांच्या चित्रणासाठी हे वैशिष्ट्यपूर्ण होते. मात्र, चित्राचे काही तपशील अस्पष्ट झाल्यामुळे त्या व्यक्तीची ओळख पटवणे कठीण झाले आहे. व्हॅनहुले यांनी एका निवेदनात म्हटले आहे, ‘इजिप्शियन चित्रकलेत बोटी हे सर्वात जास्त वेळा दिसणार्या प्रतीकांपैकी एक आहे. राजवंशपूर्व आणि प्रोटोडायनॅस्टिक काळात (सुमारे 4500-3085 इ.स.पू.) बोट हे चिन्ह सर्वव्यापी होते आणि त्याला जटिल वैचारिक आणि प्रतीकात्मक अर्थ होते.’