

केप टाऊन : वैज्ञानिक संशोधनात एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक कामगिरी समोर आली आहे. उप-सहारन आफ्रिकेत संशोधकांनी एका आफ्रिकन अँटीलोपच्या (काळवीट प्रजातीचा प्राणी) ५०,००० वर्षे जुन्या दातातून यशस्वीरीत्या ‘डीएनए’ वेगळा केला आहे. या भागातून शोधण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात जुना ‘डीएनए’ ठरला असून, वैज्ञानिक जगतात हा एक नवा विक्रम आहे.
‘क्वाटरनरी सायन्स रिव्ह्यूज’ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. उप-सहारन आफ्रिकेतील उष्ण आणि दमट हवामानामुळे सामान्यतः हजारो वर्षांपूर्वीचे 'डीएनए' नष्ट होतात. यामुळे प्राचीन मानवी पूर्वज आणि इतर प्राण्यांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्यात संशोधकांना मोठ्या अडचणी येत होत्या. स्पेनसारख्या समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात सुमारे ४,०००,००० वर्षे जुने मानवी 'डीएनए' सुरक्षित राहिल्याचे आढळले आहे. मात्र, आफ्रिकेच्या कडक उन्हाळ्यामुळे असे घडणे अशक्य मानले जात होते. यापूर्वी उप-सहारन आफ्रिकेत सापडलेला सर्वात जुना मानवी ‘डीएनए’ हा १८,००० वर्षे जुना (टांझानियामध्ये) आणि प्राण्यांचा ‘डीएनए’ केवळ ९,३०० वर्षे जुना (दक्षिण आफ्रिकेत) होता. मात्र, या नव्या शोधामुळे आफ्रिकेतील उष्ण हवामानातही दशकानुदशके ‘डीएनए’ सुरक्षित राहू शकतो, हे सिद्ध झाले आहे.
संशोधकांनी गेल्या १,१०,००० वर्षांत अस्तित्वात असलेल्या प्राण्यांच्या ३०० हून अधिक दातांचे परीक्षण केले. लॅट प्लेइस्टोसीन (शेवटच्या हिमयुगाचा उत्तरार्ध) काळातील अवशेषांमध्येही ‘डीएनए’ चे अंश सापडू शकतात का, हे तपासणे हा यामागील उद्देश होता. दक्षिण आफ्रिकेतील ‘बूमप्लास गुहेत’ सापडलेल्या ‘माऊंटन रीडबक' नावाच्या आफ्रिकन काळविटाच्या दाढेतून हा ५०,००० वर्षे जुना ‘डीएनए’ मिळाला. याशिवाय, संशोधकांना नामशेष झालेल्या लांब शिंगांच्या म्हशींचे देखील तीन जुने ‘डीएनए’ नमुने मिळाले आहेत. यातील दोन प्राणी २१,००० वर्षांपूर्वीचे तर एक १२,००० वर्षांपूर्वीचा आहे. जरी चाचणी केलेल्या सर्वच दातांमधून ‘डीएनए’ मिळाला नसला, तरी मिळालेले हे काही नमुने विज्ञानासाठी मैलाचा दगड ठरले आहेत. या यशामुळे आता आफ्रिकेतील मानवाच्या आणि वन्यजीवांच्या प्राचीन इतिहासाची नवीन पाने उलगडण्यास मोठी मदत होणार आहे.