

कैरो : इजिप्तच्या वाळवंटी भूमीखाली दडलेल्या इतिहासाच्या खजिन्यातून एक असा शोध लागला आहे, ज्याने प्राचीन संस्कृती आणि वस्त्रोद्योगाबद्दलच्या आपल्या कल्पनांना नवी दिशा दिली आहे. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी विणलेला एक साधा पण वैशिष्ट्यपूर्ण तागाचा पोशाख, ज्याला ‘तारखानचा पोशाख’ म्हणून ओळखले जाते, आज जगातील सर्वात जुना विणलेला आणि कापून शिवलेला कपडा म्हणून मान्यता पावला आहे. हा पोशाख केवळ इतिहासाचा एक अवशेष नसून, तत्कालीन समाजाच्या कलात्मकतेचा आणि कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
इजिप्तची राजधानी कैरोपासून दक्षिणेस सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या तारखान या प्राचीन दफनभूमीत सर फ्लिंडर्स पेट्री यांना 1913 साली उत्खनन करताना हा पोशाख एका ‘मस्ताबा’ (आयताकृती, सपाट छताची इजिप्शियन कबर) मध्ये आढळला. पेट्री यांना या दफनभूमीत 2000 हून अधिक कबरी आढळल्या, ज्यापैकी बर्याचशा प्रारंभिक राजवंशीय काळातील (इ.स.पू. 3100 च्या सुमारास) होत्या. कबरीतील इतर वस्तूंबरोबरच त्यांना तागाच्या कापडाचा एक मोठा ढिगारा सापडला, जो कदाचित पूर्वीच्या कबर चोरांनी बाजूला फेकून दिला असावा. हा मौल्यवान ठेवा पेट्री यांनी ब्रिटनला आणला, परंतु ‘तारखानचा पोशाख’ म्हणून त्याची खरी ओळख 1977 पर्यंत झाली नव्हती.
लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातील तज्ञांनी या ढिगार्यातील एका विशिष्ट वस्त्राचे महत्त्व ओळखले. लंडन येथील पेट्री इजिप्शियन पुरातत्त्व संग्रहालयात (युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन - UCL) सध्या प्रदर्शित असलेला हा पोशाख साधा ‘व्ही’ आकाराचा गळा असलेला आहे. तो तागाच्या धाग्यांपासून हाताने विणलेल्या तीन कापडाच्या तुकड्यांपासून बनवलेला आहे. विशेष म्हणजे, याच्या बाह्या आणि छातीच्या भागावर ‘नाईफ-प्लीट’ प्रकारची सुंदर सजावट केलेली आहे, जी कापडाला बारीक आणि टोकदार घड्या घालून तयार केली जाते.
पोशाखाचा खालचा भाग गहाळ झाल्यामुळे तो शर्ट, अंगरखा की पूर्ण लांबीचा ड्रेस होता, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि, संग्रहालयातील तज्ज्ञांच्या मते, हा पोशाख एखाद्या तरुण आणि सडपातळ महिलेसाठी बनवला गेला असावा. कार्बन डेटिंगनुसार, हा पोशाख इ.स.पू. 3482 ते 3102 या कालखंडातील असल्याचे सिद्ध झाले आहे. 2016 साली यूसीएलच्या म्युझियम आर्किऑलॉजीच्या प्राध्यापिका एलिस स्टीव्हनसन आणि नेदरलँडस्मधील ग्रोनिंगेन विद्यापीठातील आयसोटोप रसायनशास्त्रज्ञ मायकल डी यांनी या पोशाखाच्या प्राचीनत्वाला दुजोरा दिला.