Windmill Project : कुरणात उभारल्या ५० पवनचक्क्या; सुरू झाली वीजनिर्मिती

७,००० एकर जमिनीतून ‘वाऱ्या’च्या जोरावर दुप्पट कमाई!
Windmill Project
कुरणात उभारल्या ५० पवनचक्क्या; सुरू झाली वीजनिर्मिती
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेतील कॅन्सस राज्यातील एका पशुपालकाने कमाईचा एक अत्यंत वेगळा आणि नावीन्यपूर्ण मार्ग शोधून काढला आहे. चार पिढ्यांपासून केवळ पशुपालनासाठी वापरल्या जाणाऱ्या आपल्या ७,००० एकर जमिनीचा दुहेरी वापर करून त्यांनी उत्पन्‍नाचा नवा स्रोत तयार केला आहे. या कुरणावर पशुपालनासोबतच आता वाऱ्यापासून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती केली जात आहे.

पीट फेरेल नावाच्या पशुपालकाने आपल्या ७,००० एकर जमिनीपैकी काही भागात १०० टर्बाईन क्षमता असलेल्या ‘एल्क रिव्हर विंड प्रोजेक्ट’अंतर्गत ५० पवनचक्क्या बसवल्या आहेत. हा १५० मेगावॅटचा प्रकल्प २००५ मध्ये सुरू झाला होता. पवनचक्क्यांमुळे पशुपालनाच्या मूळ व्यवसायात कोणताही बदल करावा लागला नाही. जनावरे पूर्वीप्रमाणेच कुरणात चरतात आणि त्याच वेळी पवनचक्क्यांद्वारे वीजनिर्मितीही होत राहते. हे मॉडेल दाखवून देते की, शेती / पशुपालनासोबत नवीकरणीय ऊर्जा कशी सहज तयार करता येते.

या पवनचक्क्यांमधून तयार होणारी वीज थेट प्रादेशिक वीज यंत्रणेला पुरवली जाते, ज्याद्वारे हजारो घरांना वीज मिळते. पीट फेरेल यांना या प्रकल्पासाठी जमिनीचे भाडे मिळते. विशेषतः, दुष्काळाच्या काळात, जेव्हा पशुपालनातून मिळणारे उत्पन्‍न घटते, तेव्हा ही नियमित मिळणारी भाड्याची रक्कम त्यांच्यासाठी अत्यंत मोलाची ठरते. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण ७,००० एकर जमिनीपैकी केवळ ५० एकर जमिनीचा वापर टर्बाईन आणि संबंधित उपकरणांसाठी झाला आहे. उर्वरित ९९ टक्क्यांपेक्षा जास्त जमीन पूर्वीप्रमाणेच पशुपालनासाठी वापरली जात आहे.

पीट फेरेल यांच्या कुटुंबाचा वाऱ्यापासून वीजनिर्मितीचा इतिहास १०० वर्षे जुना आहे. १९२३ मध्ये त्यांच्या पणजोबांनी त्या भागात वीज पोहोचलेली नसताना ‘जॅकोब्स विंडजॅमर’ पवनचक्की आणि डेलको ग्लास बॅटरीच्या मदतीने वीज मिळवली होती. जवळपास १०० वर्षांनंतर जेव्हा पीट यांना व्यावसायिक पवनचक्की उभारण्याची ऑफर आली, तेव्हा जनावरांवर याचा विपरीत परिणाम होईल का, अशी भीती त्यांना होती. मात्र, कॅलिफोर्नियातील ‘अल्तामाऊंट पास’ प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्यांनी आपली जमीन ‘एल्क रिव्हर विंड प्रोजेक्ट’ला लीजवर देण्याचा निर्णय घेतला.

या प्रकल्पातून दरवर्षी ५,५०,००० मेगावॅट-आवर्स (MWh) विजेची निर्मिती होते, जी सुमारे ४२,००० घरांच्या वार्षिक विजेच्या गरजेइतकी आहे. पीट फेरेल या वाऱ्याला आपली ‘सर्वोत्तम विमा पॉलिसी’ मानतात; कारण यातून मिळणारे उत्पन्‍न पावसाचे प्रमाण, चाऱ्याचे उत्पादन किंवा जनावरांच्या बाजारातील भावावर अवलंबून नसते. मजबूत वारे आणि मुबलक मोकळी जमीन यामुळे कॅन्ससला आता ‘विंड एनर्जी स्टेट’ म्हणून ओळखले जात आहे. पीट फेरेल यांचे हे उदाहरण योग्य नियोजनाद्वारे कृषी क्षेत्र आणि ऊर्जा क्षेत्राचा मेळ घालून शेतकरी कसे समृद्ध होऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news