

वॉशिंग्टन : सध्याच्या उत्तर अमेरिकेत 50 लाख वर्षांपूर्वी जणू काही उड्डाण करू शकणारी व मोठ्या आकाराची खार अस्तित्वात होती. एखाद्या मांजराइतक्या आकाराच्या अशा खारीच्या जीवाश्माचा शोध आता लावण्यात आला आहे. एका प्राचीन सिंकहोलमध्ये हे विलक्षण जीवाश्म सापडले आहे.
हे जीवाश्म ‘मिओपेटौरिस्टा’ या नामशेष झालेल्या प्रजातीचे आहेत, जी प्रामुख्याने आशियात आढळते. तथापि, फ्लोरिडामध्ये देखील या प्रजातीच्या दोन नमुन्यांचे पुरावे सापडल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ मॅमलियन इव्होल्युशन’ या नियतकालिकात प्रकाशित झाले. ‘5 लाख वर्षांपूर्वी टेनेसीच्या जंगलांमध्ये गेंडे आणि मॅस्टोडन (हत्तीच्या प्राचीन प्रजाती) यांच्या वरून या प्रचंड खारी झेपावत असतील, ही कल्पनाही आश्चर्यकारक आहे,’ असे संशोधनाचे सहलेखक आणि ईस्ट टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीचे भूगोलशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक जोशुआ सॅम्युअल्स यांनी सांगितले. संशोधकांच्या मते, ‘मिओपेटौरिस्टा’ प्रजाती प्लायोसीन युगाच्या सुरुवातीला (5.3 ते 2.6 दशलक्ष वर्षांपूर्वी) बेरिंग लँड ब्रिजद्वारे आशियातून उत्तर अमेरिकेत स्थलांतरित झाली असावी. त्या काळात टेनेसीतील हवामान आशियातील जंगलांप्रमाणेच होते, त्यामुळे हे प्राणी तिथे टिकून राहू शकले असावेत. हे जीवाश्म ईस्ट टेनेसीतील ग्रे फॉसिल साइटवर एका दाताच्या अवशेषावरून ओळखण्यात आले. या ठिकाणी सापडलेल्या अन्य जीवाश्मांमुळे त्या काळात या प्रदेशात अनेक दुर्मीळ आणि विलक्षण वन्यजीव वास्तव्य करत होते, हे स्पष्ट होते. संशोधक अद्याप उड्डाण करणार्या खारींच्या उत्क्रांतीचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण त्यांचे जीवाश्म फारसे आढळत नाहीत. उत्तर अमेरिकेत या खारींचे सर्वात जुने जीवाश्म अंदाजे 3.6 कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. मात्र, 90 लाख वर्षांपूर्वी त्या जीवाश्म रेकॉर्डमधून अचानक गायब झाल्या आणि साधारण 40 लाख वर्षांपूर्वी मिओपेटौरिस्टा प्रजाती फ्लोरिडामध्ये पुन्हा आढळल्याचा पुरावा आढळतो.