

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये नुकतीच एक विशेष घटना घडली. एक वर्षापासून काहीच मिळत नसल्याने एक खाण बंद होती. मात्र, अचानक पाऊस झाला आणि तिथे मजूर पोहोचले. यावेळी थेट त्यांना लाखोंच्या घरात किंमत असलेला एक माैल्यवान हिरा मिळाला. गरीब आणि पोटावर काम असलेल्या मजुरांचे जीवनच या हिऱ्यामुळे बदलणार आहे.
दोन वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीमधून त्यांना हा हिरा मिळाला. या हिऱ्याचे वजन १६.९६ कॅरेट आहे. हा एक नैसर्गिक हिऱ्यांच्या सर्वाेत्तम प्रकारांपैकी एक असल्याचे सांगितले जातंय. खनिज अधिकारी रवी पटेल यांनी सांगितले की, हा अत्यंत माैल्यवान हिरा आहे. या हिऱ्याची किंमत ५० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जातंय. पन्ना येथे हिरे कायमच सापडतात. तिथे जवळपास खाण कामगार रोजंदारीनुसार काम करतात.
या कामगारांना हिरा सापडला, तरीही तो त्यांना मिळत नाही, तर खाणीचा पट्टा घेणाऱ्याला मिळतो. वर्षभरापूर्वी ही खाण बंद होती. सोमवारी मुसळधार पावसानंतर काही मजूर खाणीची पाहणी करण्यासाठी पोहोचले असताना त्यांना हिरा आढळून आला. ऑक्टोबर महिन्यात या हिऱ्याचा लिलाव होणार आहे. हिऱ्याच्या आलेल्या रकमेतून १२ टक्के रॉलल्टी वजा करून या ७ मजुरांना समान पैसे वाटप केले जातील. या एका हिऱ्यामुळे या मजुरांचे जीवन बदलणार आहे.