

ताजमहाल ही प्रेमाचे प्रतीक असलेली भव्य अशी संगमरवरी वास्तू आहे. १७ व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने आपली प्रिय पत्नी मुमताज महल हिच्या आठवणीत ही वास्तू उभारली होती. २५ जुलै रोजी ‘नॅशनल जिओग्राफिक’ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओत म्हटल्याप्रमाणे, ‘‘ताजमहाल हा जितका दिसतो, त्याहूनही अधिक थक्क करणारा आहे.’’ या अद्भुत वास्तूत उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्य, दृष्टिभ्रम घडवणारी रचना आणि ध्वनिशास्त्राचे अप्रतिम चमत्कार दडलेले आहेत. नॅशनल जिओग्राफिकने अधोरेखित केलेली ताजमहालाची ५ आश्चर्यकारक रहस्ये खालीलप्रमाणे :
ताजमहालाच्या अंतर्गत रचनेमध्ये एक विलक्षण वैशिष्ट्य आहे. या वास्तूचा २४० फूट उंच असलेला मुख्य घुमट ध्वनिशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत शक्तिशाली आहे. तिथे बासरीचा एक जरी सूर छेडला, तर त्याचा पडसाद (Echo) सलग ५ वेळा ऐकू येतो, ज्यामुळे तिथे एक मंत्रमुग्ध करणारे वातावरण तयार होते.
ताजमहालाचे अलौकिक सौंदर्य हे त्यात वापरलेल्या दगडाचे वैशिष्ट्य आहे. राजस्थानमधील मकराना येथून आणलेल्या उच्च दर्जाच्या पांढऱ्या संगमरवरापासून ताजमहाल बनवला गेला आहे. या दगडाची पारदर्शक गुणवत्ता अशी आहे की, ज्यामुळे ही वास्तू दिवसभरात वेगवेगळे रंग बदलते. पहाटेच्या वेळी ताजमहाल हलका गुलाबी दिसतो, दिवसा लखलखणारा पांढरा आणि चांदण्यांच्या प्रकाशात तो सोनेरी छटेत उजळून निघतो.
ताजमहाल अशा पद्धतीने डिझाईन केला गेला आहे की तो पर्यटकांच्या डोळ्यांना चकवा देतो. आपण ताजमहालाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जात असताना, जसे जसे आपण त्याच्या जवळ जातो, तसतसा ताजमहाल आकाराने मोठा होण्याऐवजी लहान होत असल्याचा भास होतो.
ताजमहालाच्या मुख्य इमारतीच्या चारही बाजूंना असलेले मनोरे केवळ सौंदर्यासाठी नाहीत, तर ते सुरक्षेचे एक मोठे साधन आहेत. डोळ्यांना हे मनोरे अगदी सरळ दिसत असले, तरी ते प्रत्यक्षात किंचित बाहेरच्या बाजूला झुकलेले आहेत. हे अशासाठी केले गेले आहे की, जेणेकरून तीव्र भूकंप झाल्यास हे मनोरे मुख्य घुमटावर किंवा कबरीवर न पडता बाहेरच्या बाजूला कोसळतील आणि मुख्य वास्तू सुरक्षित राहील.
लोककथांनुसार, सम्राट शाहजहानला यमुना नदीच्या पलीकडच्या तीरावर ताजमहालाची हुबेहूब प्रतिकृती असलेला ‘काळा ताजमहाल’ उभारायचा होता, जिथे त्याची स्वतःची कबर असणार होती. परंतु, त्याचा मुलगा औरंगजेब याने सत्ता बळकावल्यामुळे हा भव्य प्रकल्प अपूर्ण राहिला असे म्हटले जाते. मात्र, ही कथा खूप लोकप्रिय असली, तरी आधुनिक इतिहासकारांनी ही गोष्ट केवळ एक दंतकथा असल्याचे सांगत फेटाळून लावली आहे.