

वॉशिंग्टन ः वयाची चाळीशी गाठली तरी अनेक लोक आपली उमेद गमावून बसतात. अशावेळी अतिशय उतारवयातही जीवनेच्छा बाळगणार्या आणि स्वतःच्या तंदुरुस्तीची काळजी घेणार्या लोकांकडे पाहून नवी प्रेरणा मिळत असते. अशाच एक आजीबाई अमेरिकेत आहेत. त्यांचे वय आहे अवघे 103! 'अवघे' म्हणण्याचे कारण म्हणजे या वयातही त्या तरुण-तरुणींच्या उत्साहात जीममध्ये जाऊन व्यायाम करतात. त्यांचा फिटनेसही वाखाणण्यासारखाच आहे!
कॅलिफोर्नियातील कॅमेरिलो येथील रहिवासी असलेल्या 103 वर्षीय टेरेसा मूर या आठवड्यातून किमान तीन ते चारवेळा त्यांच्या स्थानिक फिटनेस सेंटरला भेट देतात तेही पूर्ण मेकअप करून आणि त्यांना शोभेल अशा दागिन्यांसह. त्यांची मुलगी शीला मूर सांगतात की, जीम ही आईसाठी तिची 'आनंदी जागा' आहे. टेरेसा यांचा जन्म इटलीमध्ये झाला आणि 1946 रोजी त्यांचे एका लष्करी अधिकार्याशी लग्न झाले. "जेव्हा तिने इटली सोडली तेव्हा ती भटकंतीचे जीवन जगत होती आणि मला वाटते की, कुतूहल हा एक मोठा प्रेरणादायी घटक होता," असे शीला यांनी सांगितले. आपल्या आईच्या जीमबद्दलच्या प्रेमाबद्दल बोलताना शीला सांगतात की, "तिथेच ती जिच्या मैत्रिणींना भेटते. मला वाटते, माझी आई एक जिज्ञासू व्यक्ती आहे." दीर्घ आणि आनंदी जीवन कसे जगावे याबद्दल, टेरेसा सल्ला देतात की, "आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. चांगल्या गोष्टींचा विचार करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट सुंदर आहे असा विचार करा, सुंदर गोष्टींचा विचार करा."