

वॉशिंग्टन ः आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरू. या ग्रहावरील लाल ठिपका किंवा 'रेड स्पॉट' नेहमीच चर्चेत असतो. हा 'रेड स्पॉट' म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नसून ते या ग्रहावर अनेक वर्षांपासून सुरू असलेले वेगवान वादळ आहे. आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने गुरूपेक्षाही मोठ्या आकाराचा एक बाह्यग्रह शोधला आहे आणि त्यावरील तसेच धुळीचे वादळही टिपले आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 40 प्रकाशवर्ष अंतरावर आहे.
हा बाह्यग्रह दोन तार्यांभोवती प्रदक्षिणा घालतो. तो गुरूपेक्षा वीस पटीने मोठ्या आकाराचा आहे. हा ग्रहही गुरूप्रमाणेच निव्वळ वायूचा गोळाच आहे. जेम्स वेब दुर्बिणीचा वापर करून खगोल शास्त्रज्ञांनी या ग्रहाच्या वातावरणात केवळ धुळीचे ढगच नव्हे तर पाणी, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडचाही छडा लावला आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'द अॅस्ट्रॉफिजिकल जर्नल लेटर्स'मध्ये देण्यात आली आहे. या ग्रहाला 'सुपर ज्युपिटर' म्हटले जात आहे. त्याचा अर्थ गुरूपेक्षा मोठ्या आकाराचा वायूचा ग्रह. अर्थात त्याचे मूळ नाव 'व्हीएचएस 1256 बी' असे आहे. तो त्याच्या दोन तार्यांभोवती इतक्या अंतरावरून प्रदक्षिणा घालतो की त्याची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी तब्बल दहा हजार वर्षे लागतात. तार्यांपासून तो मोठ्या अंतरावर असल्यामुळे त्याचे निरीक्षण करीत असताना तार्यांचा प्रकाश अडथळा आणत नाही. त्यामुळे त्याचे थेटपणे निरीक्षण करता येते.