‘सेल्फी’, सोशल मीडियामुळे होतो नकारात्मक परिणाम | पुढारी

‘सेल्फी’, सोशल मीडियामुळे होतो नकारात्मक परिणाम

वॉशिंग्टन ः अनेकांना सेल्फी टिपण्याची, ते फोटो सोशल मीडियात शेअर करण्याची सवय असते. तसेच सोशल मीडियातील इतरांच्या फोटोंशी आपले तुलना करून खिन्न होण्याचीही सवय असते. आता ‘सायन्स डायरेक्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात आढळले की, सोशल मीडियावर सतत सुशोभित प्रतिमा पाहणे आणि त्यांची तुलना करणे याचा मूड आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. फिल्टर लावून घेतलेले स्वत:चे सेल्फी पुन्हा पुन्हा पाहिल्यानेही स्वत:ची धारणा बदलते. तुम्ही न्यूनगंडाला बळी पडता. परिणामी, वाईट वाटू लागते. सोशल मीडियाचा आपल्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होत आहे. विशेषतः महिलांना याचा जास्त फटका बसतो.
अमेरिकेच्या सेंटरसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने 2021 मध्ये ‘यूथ रिस्क बिहेवियर’ या नावाखाली एक सर्वेक्षण केले.

सर्वेक्षणात आढळले की, 57 टक्के अमेरिकन किशोरवयीन मुलींना सोशल मीडियामुळे नियमितपणे उदास आणि हताश वाटते, तर 29 टक्के मुलांनी यामुळे दुःखी असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर अनेक लोक ‘फेक’ असतात. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मानसशास्त्राच्या सहायक प्राध्यापक केनिशा सिंक्लेअर-मॅकब—ाईड यांच्या मते, फोनवर उपलब्ध असलेल्या विविध फिल्टर्स आणि सौंदर्य वाढवणार्‍या अ‍ॅप्सद्वारे चेहर्‍यांची शोभा वाढवली जाते. स्त्रिया त्यांच्याशी तुलना करतात तेव्हा त्यांच्यात न्यूनगंड वाढू लागतो. सोशल मीडियाच्या अतिवापराचा झोपेवर वाईट परिणाम होतो. तसेच स्त्रिया त्यांच्या स्वतःच्या शरीराच्या प्रतिमेबद्दल नकारात्मक असतात, त्यामुळे त्यांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास दोन्हीवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यात नैराश्याची भावना वाढू लागते. महिलांना ऑनलाईन छळाचा धोकाही अधिक असतो.

Back to top button