4700 Year Old Ship | तुर्कीच्या किनाऱ्यावर तब्बल ४,७०० वर्षांपूर्वी बुडालेले जहाज

4700 Year Old Ship |
4700 Year Old Ship | तुर्कीच्या किनाऱ्यावर तब्बल ४,७०० वर्षांपूर्वी बुडालेले जहाज
Published on: 
Updated on: 

अंकारा : पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी समुद्रात बुडालेल्या सर्वात जुन्या जहाजाचा अवशेष शोधून काढल्याचा दावा केला आहे. तुर्कीच्या किनाऱ्याजवळ जगातील हे सर्वात जुने बुडालेले जहाज सापडले असून, तज्ज्ञांच्या मते हे जहाज ४,४०० ते ४,७०० वर्षे जुने आहे. याचा अर्थ हे जहाज सुरुवातीच्या कांस्य युगातील आहे; म्हणजेच ज्या कालावधीत इजिप्तचे भव्य पिरॅमिड तयार होत होते. या जहाजाच्या अवशेषांमध्ये लाकडी सांगाडा शिल्लक राहिलेला नाही; परंतु त्यात ठेवलेली मातीची भांडी समुद्राच्या तळाशी सुरक्षित सापडली आहेत. विशेष म्हणजे, काही भांड्यांमध्ये त्यांच्यामध्ये ठेवलेल्या पदार्थांचे अवशेष आजही टिकून आहेत.

हा अवशेष शोधणाऱ्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हे सुमारे १० मीटर लांब असलेले आणि भूमध्यसागरीय क्षेत्रात माल वाहून नेणारे व्यापारी जहाज होते. तुर्कीमधील अंताल्या येथील केकोवा बेटाच्या किनाऱ्याजवळ समुद्राच्या लाटांच्या फक्त ३० मीटर खाली एका उतारावर जहाजाशी संबंधित वस्तू विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या. भूमध्यसागरीय पुरातत्त्व मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या तुर्कीच्या अकदेनिज विद्यापीठाचे प्राध्यापक हाकान ओनज यांनी सांगितले की, हे बुडालेले जहाज समुद्राच्या तळाशी एका ‘टाईम कॅप्सूल’सारखे आहे. तज्ज्ञांना तिथे दगडाचे तीन मोठे नांगर आणि ‘ॲम्फोरा’ नावाची मातीची ३० हून अधिक भांडी सापडली आहेत.

जहाजाचा लाकडी भाग पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे रेडिओकार्बन डेटिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे वय अचूक मोजता आले नाही. रेडिओकार्बन डेटिंग प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थांमधील कार्बनच्या एका रूपाचे मोजमाप केले जाते. त्यामुळे, पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी त्याऐवजी ‘ॲम्फोरा’च्या आकाराचे विश्लेषण केले. केकोवा येथे सापडलेली मातीची भांडी अत्यंत विशिष्ट स्वरूपाची आहेत; ज्यांना दोन हँडल, मध्यभाग फुगीर आणि सपाट तळ आहे. प्राध्यापक ओनज यांनी स्पष्ट केले की, ही रचना इजिप्त आणि अरेबियन प्रदेशात सापडलेल्या ४,४०० ते ४,७०० वर्षे जुन्या ॲम्फोरासारखीच जुळते. सजावटीच्या पद्धतींची तुलना केल्यावर हे सिद्ध होते की, हा अवशेष १०० टक्के सुरुवातीच्या कांस्य युगातील आहे.

या मोहिमेत सहभागी असलेल्या पाणबुड्यांनी ही भांडी पाण्याबाहेर पृष्ठभागावर आणली आहेत. हजारो वर्षे पाण्याखाली राहिल्यानंतर आता त्यांना संरक्षित केले जात आहे. ऑस्ट्रेलियन मॅक्वेरी विद्यापीठाच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ कॅरिन सोवाडा यांनी सांगितले की, ही भांडी अगदी सुस्थितीत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्यामध्ये अजूनही दाट आणि चमकदार अवशेष शिल्लक आहेत. हे मोठे मातीचे जार (ॲम्फोरा) कशासाठी वापरले जात होते, याचा शोध संशोधन घेतला जात आहे. सोवाडा यांच्या मते, त्यात ऑलिझिव्ह ऑईल, वाईन किंवा झाडांचा डिंक (ऱ्हाईन) भरलेला असावा. लोक गंतव्यस्थानी पोहोचल्यावर हे जार रिकामे करून अनेक वर्षे पुन्हा वापरत असावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news