

वॉशिंग्टन : डायनासोरचा जन्म होण्यापूर्वी आपली पृथ्वी आजच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. सुमारे 50 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचा बहुतांश भाग हा केवळ उघडे खडक आणि कोरड्या मातीने व्यापलेला होता. तिथे ना झाडे होती, ना गवत, ना फुले. त्यावेळी जीवन केवळ महासागरांपुरतेच मर्यादित होते. मात्र, एका ऐतिहासिक घटनेने पृथ्वीचे नशीब कायमचे बदलले. ती घटना म्हणजे वनस्पतींचे जमिनीवर झालेले आगमन.
भूसंशोधकांच्या मते, वनस्पतींचा प्रवास पाण्यापासून सुरू झाला. सुरुवातीचे वनस्पतीसदृश जीव हे ‘शेवाळ’सारखे साधे आणि सूक्ष्म हिरवे जीव होते. हे शेवाळ गेल्या एक अब्ज वर्षांपासून महासागरांमध्ये अस्तित्वात आहे. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वापरून स्वतःचे अन्न तयार करण्याची प्रक्रिया म्हणजेच ‘प्रकाशसंश्लेषण’ हे शेवाळ करत असे. या प्रक्रियेतून ‘ऑक्सिजन’ हा उपउत्पादन म्हणून बाहेर पडत असे. सुरुवातीला पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण नगण्य होते. मात्र, लाखो वर्षांच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमुळे वातावरणात ऑक्सिजन साठू लागला. यालाच वैज्ञानिक भाषेत ‘ग्रेट ऑक्सिजनेशन इव्हेंट’ म्हटले जाते.
या बदलामुळेच मनुष्य आणि प्राण्यांसारख्या प्रगत जीवांची उत्क्रांती होणे शक्य झाले. सुमारे 47 कोटी वर्षांपूर्वी पहिल्या खर्या वनस्पतींची उत्क्रांती हिरव्या शेवाळापासून झाली. पाण्यात राहणे सोपे होते. कारण तिथे पोषक तत्त्वे सहज मिळतात. परंतु, कोरड्या जमिनीवर जगणे सोपे नव्हते. जमिनीवर तग धरण्यासाठी या वनस्पतींनी स्वतःमध्ये काही महत्त्वाचे बदल घडवून आणले. मेणासारखे आवरण (Cuticle) : शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी पानांवर मेणासारखा थर तयार झाला. मजबूत पेशीभित्तिका : गुरुत्वाकर्षणाविरुद्ध ताठ उभे राहण्यासाठी पेशी अधिक मजबूत झाल्या. मुळांसारखी रचना (Rhizoids) : जमिनीला घट्ट धरून ठेवण्यासाठी आणि पाणी शोषण्यासाठी मुळांसारखी प्राथमिक रचना विकसित झाली.
पृथ्वीवरील सुरुवातीच्या जमिनीवरील वनस्पती अत्यंत लहान आणि साध्या होत्या. त्या आजच्या ‘मॉस’ (Mosses) किंवा ‘लिव्हरवॉर्ट्स’सारख्या दिसत असत. 43 कोटी वर्षांपूर्वीच्या ‘कूकसोनिया’ (Cooksonia) सारख्या वनस्पतींचे जीवाश्म असे दर्शवतात की, या वनस्पती केवळ एक-दोन इंच उंच होत्या आणि त्यांना खरी मुळे किंवा खोड नव्हते. वनस्पतींचे जमिनीवर येणे ही पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. कारण यामुळेच आज आपण पाहात असलेली हिरवीगार पृथ्वी आणि जीवसृष्टी अस्तित्वात येऊ शकली, असे भूवैज्ञानिकांचे मत आहे.