Electric car : बॅटरीशिवायच 2 हजार कि.मी. धावणारी इलेक्ट्रिक कार

वॉशिंग्टन ः जगभरात सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले भाव आणि हवेचे प्रदूषण यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक बाईक आणि मोटारींकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र, अशा वाहनांमध्ये ‘बॅटरी’ हा एक कळीचा मुद्दा असतो. आता एका कंपनीने अशी इलेक्ट्रिक कार बनवली आहे, ज्यामध्ये बॅटरीच नाही, म्हणजे ही कार बॅटरीशिवाय धावणार आहे. शिवाय या कारची रेंजही मोठीच आहे. ही कार तब्बल 2 किलोमीटर धावू शकते.
‘क्वाँटिनो इलेक्ट्रिक व्हेईकल’ अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. ही कार कंपनी बॅटरी नसल्याच्या कारणामुळेही चर्चेत आली आहे. या इलेक्ट्रिक कारला ‘क्वांटिनो ट्वेंटी फाईव्ह’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये लिथियम आयन बॅटरीऐवजी समुद्राच्या पाण्याचे किंवा औद्योगिक पाण्याच्या कचर्याचे ‘नॅनो-स्ट्रक्चर्ड बाय-आयोन’ रेणू वापरण्यात येतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, समुद्राचे पाणी किंवा औद्योगिक पाण्याचा कचरा इंधन म्हणून वापरून तुम्ही ही इलेक्ट्रिक कार चालवू शकता. हे पाणी जैवइंधनाप्रमाणे कार्य करते आणि जैवइंधन बिनविषारी, ज्वलनशील आणि गैर-घातक आहे, म्हणजेच ते पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवत नाही. यातून वीज तयार होते, जी कारच्या मोटरला ऊर्जा देते. कारच्या चारही चाकांवर इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे.
एकदा टाकी भरली की कार 2000 किलोमीटरची रेंज देऊ शकते. त्याचा कार्बन फूटप्रिंट नगण्य आहे, म्हणजे त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. कंपनीने या इलेक्ट्रिक कारची सुमारे 5 लाख कि.मी. चाचणी घेतली असून ही कार अतिशय वेगवान आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार केवळ 3 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0 ते 100 कि.मी.चा वेग गाठण्यास सक्षम आहे. इलेक्ट्रिक कार असल्याने ती आवाजही करत नाही, ज्यामुळे ध्वनी प्रदूषणालाही आळा बसेल.