‘ती’ एकाच वेळी दोन्ही हातांनी, वेगवेगळ्या भाषेत लिहिते! | पुढारी

‘ती’ एकाच वेळी दोन्ही हातांनी, वेगवेगळ्या भाषेत लिहिते!

चेन्नई ः आपल्या देशात असामान्य प्रतिभा किंवा कौशल्य असलेले अनेक लोक होऊन गेलेत व सध्याही आहेत. शकुंतलादेवी यांचे गणित विषयातील थक्क करणारे नैपुण्य बॉलीवूडच्या एका चित्रपटातूनही दाखवण्यात आले होते. चित्रपटात दाखवली जाणारी काही कौशल्येही अगदीच काल्पनिक असतात असे नाही. ‘थ—ी इडियटस्’ मधील वीरू सहस्त्रबुद्धे नावाची व्यक्ती एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहित असते. अशी खरीखुरी व्यक्ती कर्नाटकात आहे. अवघ्या 17 वर्षांची ही मुलगी दोन्ही हातांनी दोन वेगवेगळ्या भाषेत एकाच वेळी लिहू शकते. इतकेच नव्हे तर दोन्ही हातांनी ती वेगवेगळ्या अकरा प्रकारे लेखन करू शकते!

सोशल मीडियावर व्हायरल होत असणारी ही मुलगी कर्नाटकातील मंगळुरू येथील रहिवासी असून तिचे नाव आदी स्वरूपा असे आहे. तिने आपल्या अनोख्या टॅलेंटमुळे पालकांचे, शहराचे आणि देशाचेही नाव उंचावले आहे. कारण तिच्या नावावर आता जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. 17 वर्षीय आदी स्वरूपा एकाच वेळी इंग्रजी आणि कन्नड या दोन्ही भाषेत लिहू शकते. शिवाय ती एका मिनिटात 45 शब्द वेगवेगळ्या दिशेने म्हणजे उलटक्रमाने लिहू शकते. याबद्दल लता फाऊंडेशनने तिच्या या अनोख्या कौशल्याची नोंद घेतली आहे.

सध्या या आदी स्वरूपाचा दोन्ही हातांनी वेगवेगळ्या शैलीत लिहित असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असून तिच्या या कलेचे अनेकांनी कौतुक केले आहे. या मुलीच्या अनोख्या पद्धतीने लिखाण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. एका ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ही मंगलोरमधील ‘आदी स्वरूपा’ आहे, जी 11 वेगवेगळ्या शैलीमध्ये लिहू शकते. तिच्या मेंदूचे दोन्ही भाग एकाच वेळी काम करतात, जे लाखातील एक आश्चर्य आहे. तिच्या या कौशल्याला अ‍ॅम्बिडेक्सटेरिटी म्हणून ओळखले जाते.”

Back to top button