पृथ्वीसारख्या आणखी एका ग्रहाचा शोध | पुढारी

पृथ्वीसारख्या आणखी एका ग्रहाचा शोध

वॉशिंग्टन ः खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून अवघ्या 31 प्रकाशवर्ष अंतरावर पृथ्वीच्याच आकाराचा एक बाह्यग्रह शोधून काढला आहे. या ग्रहावरील तापमान व हवामान पाहता तो जीवसृष्टीस अनुकूल असावा असा अंदाज आहे. या बाह्यग्रहाला ‘वूल्फ 1069 बी’ असे नाव देण्यात आले आहे. एखाद्या ग्रहावर जीवसृष्टीचे अस्तित्व निर्माण होण्यासाठी त्याचा पृष्ठभाग कठीण, खडकाळ असावा लागतो. तसेच त्याचे तार्‍यापासूनचे अंतर तेथील तापमान योग्य असण्यासाठी योग्य असावे लागते. अशा ग्रहावर द्रवरूप पाणी असणेही गरजेचे असते.

आता जो बाह्यग्रह शोधण्यात आला आहे, तो आपल्या तार्‍यापासून अशाच योग्य अंतरावर आहे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमीच्या वैज्ञानिकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. हा ग्रह एका खुजा लाल तार्‍याभोवती प्रदक्षिणा घालतो. सिग्नस तारामंडलातील हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे 31 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. त्याचे वस्तुमान जवळजवळ पृथ्वीइतकेच आहे. शिवाय या ग्रहावरील तापमान व वातावरण मानवाला राहण्यासाठीही योग्य आहे. आता या ग्रहावर अशा रसायनांचा शोध घेतला जात आहे जे जीवसृष्टीचे संकेत देऊ शकतात.

Back to top button