Ancient Tomb in Egypt | इजिप्तमध्ये सापडली ४,३५० वर्षे जुनी प्राचीन कबर

राजाच्या ‘गुप्त माहितीच्या रक्षका’चा शोध
Ancient Tomb in Egypt |
Ancient Tomb in Egypt | इजिप्तमध्ये सापडली ४,३५० वर्षे जुनी प्राचीन कबर
Published on
Updated on

कैरो : इजिप्तमधील प्रसिद्ध ‘सक्कारा’ पुरातत्त्व स्थळावर उत्खननादरम्यान पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी एक अत्यंत महत्त्वाची प्राचीन कबर शोधून काढली आहे. ही कबर राजाच्या ‘राजकीय हुकमांच्या गुप्त माहितीचे रक्षण करणाऱ्या’ एका वरिष्ठ अधिकाऱ्याची असल्याचे इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ‘सेखेन्तिओ-प्तह’ (Sekhentio-Ptah) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो इसवी सन पूर्व २६४९ ते २१५० या काळातील ‘ओल्ड किंगडम’च्या सत्तेवेळी तिथे राहत होता. हा काळ गीझाच्या जगप्रसिद्ध पिरॅमिडस्‌च्या उभारणीसाठी विशेष ओळखला जातो.

‘राजकीय हुकमांच्या गुप्त माहितीचा रक्षक’ ही पदवी गूढ वाटत असली, तरी ती तत्कालीन प्रशासकीय आणि सरकारी कामकाजाशी संबंधित होती. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या इजिप्तॉलॉजी विभागाच्या क्लिनिकल प्रोफेसर ॲन मॅसी रॉथ यांच्या मते, या पदवीचा अर्थ असा होतो की, राजाचे अधिकृत दस्तावेज आणि ते लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रमुख म्हणून त्याला गोपनीय माहिती हाताळण्याचा अधिकार होता. राजाच्या मुख्य लिपिकांमध्ये ही एक सामान्य पदवी मानली जात असे.

कबरीतील नोंदींनुसार, सेखेन्तिओ-प्तह याच्याकडे ‘राजाच्या सर्व कामांचा निरीक्षक’ आणि ‘शाही दस्तावेजांचा प्रमुख निरीक्षक’ अशा इतरही अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या होत्या. उत्खननादरम्यान या सुशोभित कबरीत एक अर्पण टेबल, शुद्धीकरणाचे भांडे आणि दोन ‘बनावट दारे’ सापडली आहेत. प्राचीन इजिप्शियन परंपरेनुसार, ही बनावट दारे म्हणजे एक प्रतीकात्मक रचना असे, ज्यातून मृत व्यक्तीचा आत्मा कबरीत हवा तेव्हा ये-जा करू शकतो अशी त्यांची धारणा होती.

या द्वारांच्या बनावटीवरून ही कबर सुमारे ४,३५० वर्षांपूर्वीची (पाचव्या किंवा सहाव्या राजवंशातील) असावी असा अंदाज लावला जात आहे. याशिवाय कबरीमध्ये १०० हून अधिक ‘शब्ती’ नावाच्या सूक्ष्म मूर्ती आढळल्या आहेत. मृत्यूनंतरच्या जगात या मूर्ती मृत व्यक्तीच्या सेवकाप्रमाणे काम करतात, असा इजिप्शियन लोकांचा विश्वास होता. संशोधकांना तिथे ससाण्यासारखा चेहरा असलेल्या ‘होरस’ देवाची लाकडी मूर्ती आणि ‘ममी’साठी वापरल्या जाणाऱ्या विशेष प्लॅस्टरचे अवशेषही सापडले आहेत. मात्र, सेखेन्तिओ-प्तहची ममी अद्याप स्पष्टपणे ओळखता आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news