4.16 अब्ज वर्षांपूर्वीच्या खडकांचा कॅनडात शोध!

पृथ्वीवरील जीवसृष्टीचे उलगडू शकतात रहस्य
4.16 billion year old rocks found in canada
4.16 अब्ज वर्षांपूर्वीच्या खडकांचा कॅनडात शोध! Pudhari File Photo
Published on
Updated on

ओटावा : कॅनडाच्या हडसन उपसागराच्या पूर्वेकडील किनार्‍यावरील एका दुर्गम खडकाळ प्रदेशात पृथ्वीवरील सर्वात जुने खडक सापडले असल्याचा दावा एका नवीन अभ्यासात करण्यात आला आहे. हे खडक तब्बल 4.16 अब्ज वर्षे जुने असून, ते आपल्या ग्रहाच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळातील भूकवचाचे अवशेष आहेत. या शोधामुळे पृथ्वीच्या प्राचीन इतिहासाची आणि जीवसृष्टीच्या उदयाची महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘सायन्स’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ‘नुव्हुआगिट्टुक ग्रीनस्टोन बेल्ट’ नावाच्या या प्रदेशातील पट्टेदार राखाडी खडकांचे वय निश्चित करण्यात आले आहे. शास्त्रज्ञांनी किरणोत्सर्गी समस्थानिकांच्या (radioactive isotopes) क्षयाच्या आधारे वय मोजण्याच्या दोन वेगवेगळ्या शास्त्रीय पद्धती वापरून हा निष्कर्ष काढला आहे. या शोधामुळे याच शास्त्रज्ञांच्या पूर्वीच्या एका वादग्रस्त अभ्यासाला मोठे बळ मिळाले आहे. ओटावा विद्यापीठातील प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सहलेखक जोनाथन ओ’नील यांनी सांगितले की, ‘हे ज्वालामुखी खडक किमान 4.16 अब्ज वर्षे जुने आहेत; पण माझे ठाम मत आहे की, त्यांचे सर्वोत्तम वय 4.3 अब्ज वर्षे असावे.

यापेक्षा जुने खडक जगात कुठेही सापडलेले नाहीत.’ सुमारे 4.57 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती एका तप्त लाव्हारसाच्या गोळ्याच्या रूपात झाली. सुरुवातीची सुमारे 60 कोटी वर्षे, ज्याला ‘हेडियन युग’ म्हटले जाते, त्या काळात ग्रह हळूहळू थंड होत होता आणि खडकाळ पृष्ठभाग तयार होऊ लागला होता. हा काळ अत्यंत अशांत होता. पृथ्वीवर लघुग्रहांचा सतत मारा होत होता आणि ‘थिया’ नावाच्या एका आदिग्रहाच्या महाभयंकर आघातामुळे पृथ्वीचा एक तुकडा वेगळा होऊन चंद्राची निर्मिती झाली. कालांतराने, पृथ्वीचे कवच अनेक भूस्तरांमध्ये (Tectonic Plates) विभागले गेले.

या प्लेटस् एकमेकांवर आदळल्याने किंवा एक-दुसर्‍याखाली सरकल्याने बहुतांश प्राचीन खडक तीव्र उष्णता आणि दाबामुळे नष्ट झाले. मात्र, कॅनडाचा हा प्रदेश अशा भूगर्भीय हालचालींपासून दूर राहिल्याने येथील खडक अब्जावधी वर्षे आपल्या मूळ स्वरूपात टिकून राहिले आहेत. यापूर्वी शास्त्रज्ञांमध्ये या खडकांचे वय किमान 3.8 अब्ज वर्षे असल्याबद्दल एकमत होते. मात्र, 2008 साली ओ’नील आणि त्यांच्या टीमने हे खडक 4.3 अब्ज वर्षे जुने असल्याचा दावा केला होता. आता नवीन आणि अधिक अचूक तंत्रज्ञानाने केलेल्या विश्लेषणामुळे त्यांचा जुना दावा अधिक सिद्ध झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news