भविष्यात मशिन देणार माणसाला जन्म?

भविष्यात मशिन देणार माणसाला जन्म?
Published on
Updated on

न्यूयॉर्कः भविष्यातील दुनिया कशी असेल याची आज आपण कल्पनाही करू शकणार नाही. सध्याचे युग रोबो, नॅनो टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आहे. अनेक अद्ययावत अशी यंत्रे सध्या निर्माण होत आहेत. भविष्यात तर असेही यंत्र तयार होऊ शकेल जे चक्क माणसालाही जन्म देईल! याबाबतचा कल्पनाविलास सध्या एका व्हिडीओमधून करण्यात आलेला आहे.

अशा मशिनमुळे महिलांची गर्भधारणेपासून सुटका होईल, त्यांना प्रसूती वेदना सहन कराव्या लागणार नाहीत. विज्ञान संवादक हाशेम अल घैली यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कृत्रिम भ्रूण केंद्र दाखवण्यात आले आहे. यात शेकडो कृत्रिम गर्भांची निर्मिती करण्यात आल्याचे दाखवले आहे, ज्याद्वारे मशिन्स माणसांना जन्म देऊ शकतात. मशिन्स फक्त जन्म देणार नाहीत तर तुमच्या मोबाईलमधील अ‍ॅपद्वारे तुम्हाला तुमच्या मुलात कोणते गुण, कोणत्या सवयी हव्यात हेही तुम्ही फीड करू शकणार आहात. थोडक्यात तुम्ही तुमच्या मुलाला माणूस म्हणून सजवू शकणार आहात. कृत्रिम गर्भ केंद्राला 'एक्टोलाईफ' असे नाव देण्यात आले आहे. ही एक कॉम्प्युटर मॅट्रिक्स प्रणाली आहे. 'एक्टोलाईफ'मधील बर्थ पॉडस्मध्ये कृत्रिम भ्रूण विकसित केले जाईल. गर्भाप्रमाणे रचना असणार्‍या बर्थ पॉडस्मध्येच भ्रूणाची वाढ होईल.

कृत्रिम भ्रूणाच्या जीन्समध्ये हवे ते बदल करता येतील. हे बर्थ पॉडस् घरातही ठेवता येणार असून सौरऊर्जेवर हे बर्थ पॉडस् चालतील. प्रत्येक दिवशी भ्रूणाची होणारी वाढ तुम्ही पाहू शकाल. मुलांना कोणत्या सवयी असाव्यात हे तुम्ही फीड करू शकता. आपले अपत्य फुटबॉलपटू बनावे अशी इच्छा असेल तर पालक भ्रूणाच्या जीन्समध्ये तसा बदल करू शकतील. प्रत्येक कृत्रिम केंद्रात 400 बर्थ पॉडस् असतील. महिलेच्या गर्भाबाहेर बर्थ पॉडस्द्वारे मशिन माणसाला जन्म देईल. विज्ञान संवादक हाशेम अल घैलींच्या म्हणण्यानुसार गर्भ केंद्रात कृत्रिम भ्रूणांची जणू 'शेती' केली जाईल आणि तंदुरुस्त, बुद्धिमान बालकांचा जन्म होईल. अर्थात कृत्रिम गर्भ केंद्र 'एक्टोलाईफ' ही एक निव्वळ कल्पना किंवा काल्पनिक विज्ञान कथा आहे. असे तंत्रज्ञान जगात कुठेही विकसित झालेले नाही किंवा होतही नाही. अर्थातच या भन्नाट कल्पनाविलासाची सध्या जगभर चर्चा होत आहे. शिवाय असा प्रकार नैतिकद़ृष्ट्याही कितपत योग्य आहे याचीही चर्चा होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news