गृहिणींनो काळजी घ्या, खरकटी भांडी ठरतील जीवघेणी

गृहिणींनो काळजी घ्या, खरकटी भांडी ठरतील जीवघेणी

नवी दिल्ली ः स्वच्छता हा आरोग्याचा एक मूलमंत्र आहे. स्वच्छतेचे जितके अधिक भान असेल तितके आरोग्य चांगले राहण्याची शक्यता अधिक असते. आपल्या देशात खरे तर प्राचीन काळापासूनच घरगुती, सामाजिक आणि धार्मिक बाबतीतही स्वच्छतेला महत्त्व देण्यात आले आहे. काही म्हणी तर स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात यासाठीच बनवल्या गेल्या असल्याचे दिसून येते. त्यापैकीच एक हिंदी भाषेतील म्हण म्हणजे 'झुठे बर्तन कंगाली लाते है'. घरात गरिबी येऊ नये यासाठी का होईना ज्या त्यावेळी खरकटी भांडी स्वच्छ करून ठेवण्याची अनेकांना सवय असते. अमेरिकेत मात्र दोन-दोन दिवस सिंकमध्ये खरकटी भांडी पडून राहतात असे एका पाहणीतून आढळले आहे. या प्रकारामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोकाही वाढतो.

आपल्याकडे बहुतांश घरात खरकटी भांडी रात्री झोपण्यापूर्वीच स्वच्छ करून ठेवली जात असतात. अर्थात सर्वांनाच ते शक्य होत नसले तरी दोन-दोन दिवस खरकटी भांडी ओट्यावरील सिंकमध्येच पडून आहेत असे शक्यतो होत नाही. अमेरिकेत हा प्रकार अधिक आहे. तिथे सरासरी दोन दिवसांपर्यंत अशी खरकटी भांडी पडलेली असतात. निम्मे लोक आठवड्यातून केवळ तीन दिवस डिशवॉशर चालवतात. याचा अर्थ जोपर्यंत त्यांच्याकडे खाण्या-पिण्यासाठी अतिरिक्त स्वच्छ भांडी असतात तोपर्यंत ते खरकटी भांडी स्वच्छ करीत नाहीत. विशेषतः आर्थिक रूपाने समृद्ध घरांमध्ये खरकटी भांडी अधिक काळ सिंकमध्ये पडून असल्याचेही दिसून आले आहे. 'वन पोल'च्या या सर्व्हेमधून असेही दिसले की एका अमेरिकन नागरिकाने आपल्या फ्रीजरमध्ये गेल्यावर्षी सरासरी पाच वस्तू ठेवल्या आणि वर्षभर त्यांचा वापरच केला नाही.

'यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन' (सीडीसी) च्या म्हणण्यानुसार अमेरिकेत दूषित अन्न खाल्ल्याने दरवर्षी 4.8 कोटी लोक आजारी पडतात. सिंकमध्ये दीर्घकाळ खरकटी भांडी पडून राहिल्याने त्यांच्यामध्ये सालमोनेला, लिस्टिरिया आणि ई कोलायसारखे जीवाणू विकसित होतात. 'एनएसएफ इंटरनॅशनल'च्या सिनिअर प्रोजेक्ट मॅनेजर लीसा याक्स यांनी सांगितले की हे जीवाणू निरोगी लोकांवर अधिक प्रभाव दाखवत नाहीत; पण जे आधीच आजारी आहेत किंवा ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमजोर आहे, त्यांना या जीवाणूंचा धोका अधिक असतो. अधिक गंभीर स्थितीत गर्भपात आणि किडनी निकामी होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे घरी लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती स्त्री असेल तर भांड्यांच्या स्वच्छतेकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news