

बर्लिन : नैऋत्य जर्मनीतील होहले फेल्स गुहेत उत्खनन करताना पुरातत्त्वज्ञांना सुमारे 40,000 वर्षांपूर्वीच्या तीन छोट्या कलाकृती सापडल्या होत्या. या मूर्ती प्राचीन चित्रात्मक कलेच्या काही सर्वात जुन्या उदाहरणांपैकी एक मानल्या जातात. त्यातील एक अतिशय लहान व हस्तिदंतात कोरलेली पक्ष्याची प्रतिमा ही जगातील सर्वात जुनी पक्ष्याची मूर्ती मानली जाते. ही मूर्ती दोन भागांमध्ये सापडली. 2001 मध्ये धडाचा भाग आणि 2002 मध्ये उर्वरित भाग आढळला. केवळ 4.7 सेंटिमीटर (1.85 इंच) आकाराच्या या कोरीव कामात डोळे, टोकदार चोच, लहान पाय, शेपटी आणि पिसांसाठी असंख्य रेषा यांचा समावेश आहे.
पुरातत्त्वज्ञ निकोलस कॉनार्ड यांनी 2003 मध्ये ‘नेचर’ जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, या मूर्तीचा डोक्याचा आकार आणि मान पाहता हा पक्षी पाणपक्षीडायव्हर, कॉर्मोरंट किंवा बदक असावा. या पक्ष्याच्या मूर्तीशिवाय, उत्खननात घोडा किंवा गुहेतील अस्वलाचे डोके आणि अर्धा माणूस, अर्धा सिंह असलेली उभी मूर्ती सापडली. या शोधांवरून वरचा डॅन्यूब नदीचा प्रदेश हा अपर पॅलिओलिथिक कालखंडात (50,000 ते 12,000 वर्षांपूर्वी) सांस्कृतिक नवकल्पनांचे केंद्र असावा, असा अंदाज कॉनार्ड यांनी व्यक्त केला. या मूर्तीचा नेमका उपयोग स्पष्ट नाही. काही तज्ज्ञांचे मत आहे की, अशा हत्तीच्या दातांवरील कोरीव मूर्ती ‘शिकार जादू‘ म्हणून वापरल्या जात असत. म्हणजेच, एखाद्या शिकारपटूला यश मिळावे म्हणून एखादा धार्मिक व्यक्ती अशा मूर्तींचा वापर करत असे. मात्र, पाणपक्षी शिकारीसाठी महत्त्वाचे अन्न नव्हते. त्यामुळे कदाचित त्या लोकांनी फक्त आवडलेल्या प्राण्यांचे चित्रण केले असावे, असा कॉनार्ड यांचा निष्कर्ष आहे. ही गुहा ऑरिग्नेशियन कालखंडात (43,000 ते 28,000 वर्षांपूर्वी) वसलेली होती. याच काळात युरोपात क्रो-मॅग्नन मानवांनी स्थैर्य मिळवले आणि निएंडरथल मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले.
या काळात कलात्मक क्रांती झाली आणि वीनस मूर्ती, संगीत वाद्ये, अलंकार आणि गुहाचित्रे यांसारख्या नवनवीन कलाकृती निर्माण झाल्या. विशेषतः, प्राण्यांचे रेखाटन आणि कोरीव काम मोठ्या प्रमाणावर केले जात होते.