

कैरो : इतिहासाच्या पानांमध्ये अनेक रहस्ये दडलेली असतात; पण कधीकधी काही शोध आपल्याला थेट भूतकाळातच घेऊन जातात. असाच एक अविश्वसनीय शोध इजिप्तमध्ये लागला आहे, जिथे संशोधकांना एका प्राचीन कलाकृतीवर तब्बल 4000 वर्षे जुना हाताचा ठसा सापडला आहे. हा ठसा त्या काळातील एका अज्ञात कारागिराच्या जीवनाची आणि त्याच्या कामाची दुर्मीळ झलक देतो. हा शोध म्हणजे केवळ एक ऐतिहासिक पुरावा नसून, हजारो वर्षांपूर्वी जगलेल्या एका व्यक्तीच्या अस्तित्वाची ती एक वैयक्तिक खूण आहे.
हा हाताचा ठसा एका ‘सोल हाऊस’ म्हणजेच ‘आत्म्याच्या घरा’च्या खालील बाजूस सापडला आहे. प्राचीन इजिप्तमध्ये मृत व्यक्तीच्या आत्म्याला विश्रांती मिळावी, या उद्देशाने अशा घरांच्या प्रतिकृती बनवून त्या कबरींमध्ये ठेवल्या जात असत. केंब्रिज विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रतिकृतींमध्ये आत्म्यासाठी अन्नदेखील ठेवले जात असे. यामध्ये प्रामुख्याने भाकरी, लेट्यूस (एक प्रकारची पालेभाजी), जनावरांची मुंडकी यांसारख्या गोष्टींचा समावेश असे. हे ‘आत्म्याचं घर’ इ.स. पूर्व 2055 ते 1650 या काळातील असून, ते दक्षिण इजिप्तमधील लक्झर शहरापासून सुमारे 280 किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘देर रिफा’ नावाच्या ठिकाणी सापडले होते. केंब्रिज विद्यापीठाच्या फिट्झविलियम संग्रहालयातील संशोधक त्यांच्या आगामी ‘मेड इन एन्शियंट इजिप्त’ या प्रदर्शनाची तयारी करत असताना त्यांना हा अनपेक्षित शोध लागला. संशोधकांच्या मते, हे घर बनवणार्या कारागिराने माती सुकण्यापूर्वी ती हाताळली असावी, ज्यामुळे त्याचा हाताचा ठसा त्यावर कायमचा उमटला.
फिट्झविलियम संग्रहालयाच्या क्युरेटर आणि वरिष्ठ इजिप्तशास्त्रज्ञ हेलन स्ट्रडविक यांनी सांगितले की, ‘आम्हाला अनेकदा कलाकृतींवर किंवा शवपेटीवरील वार्निशमध्ये बोटांचे अस्पष्ट ठसे आढळले आहेत, पण अशा प्रकारे संपूर्ण हाताचा ठसा मिळणे हे अत्यंत दुर्मीळ आणि रोमांचक आहे. ‘आत्म्याच्या घरा’ची निर्मिती प्रक्रियादेखील रंजक होती. कुंभार आधी लाकडी काड्यांचा सांगाडा तयार करून त्यावर ओली माती लिंपत असत. त्यानंतर जेव्हा ही प्रतिकृती उच्च तापमानात भाजली जात असे, तेव्हा आतील लाकडी सांगाडा जळून जात असे आणि केवळ मातीची पक्की प्रतिकृती शिल्लक राहत असे.