

वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या किनारपट्टीवर संशोधन करणार्या शास्त्रज्ञांना समुद्राच्या अथांग खोलीत एक अत्यंत दुर्मीळ आणि आश्चर्यकारक गोष्ट सापडली आहे. शास्त्रज्ञांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘ब्लॅक कोरल’ (काळा पोवळा/प्रवाळ) शोधून काढला असून, त्याचे अवाढव्य स्वरूप पाहून तज्ज्ञही थक्क झाले आहेत.
वेलिंग्टनच्या व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. हा पोवळा 13 फुटांपेक्षा जास्त उंच आणि सुमारे 15 फूट रुंद आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, हा पोवळा 300 ते 400 वर्षे जुना असावा. सागरी जीवशास्त्रज्ञ प्रोफेसर जेम्स बेल यांनी सांगितले की, त्यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी इतका मोठा पोवळा कधीच पाहिला नाही. सहसा हे पोवळे 2-3 मीटरपेक्षा मोठे नसतात. याचे नाव ‘ब्लॅक कोरल’ असले तरी तो वरून पांढरा दिसतो. याचे कारण असे की, त्याच्या सांगाड्यावर राहणारे जिवंत जीव पांढर्या रंगाचे असतात. मात्र, या जीवाचा मुख्य सांगाडा हा गडद काळ्या रंगाचा असतो.
तज्ज्ञांच्या मते, हे महाकाय पोवळे वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. हे पोवळे अत्यंत संथ गतीने वाढतात. त्यांना थोडी जरी इजा झाली तरी ती भरून निघायला अनेक वर्षे लागतात. हे विशाल पोवळे समुद्राच्या खोलीत राहणार्या इतर लहान जीवासांठी एखाद्या घराप्रमाणे काम करतात. मोठे आणि जुने पोवळे आपली संख्या वाढवण्यासाठी आणि सागरी परिसंस्था टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.
न्यूझीलंडच्या पर्यावरण विभागाचे तज्ज्ञ रिचर्ड किंसे यांनी हा अनुभव ‘दुर्मीळ आणि अविस्मरणीय’ असल्याचे म्हटले आहे. सध्या सरकार आणि शास्त्रज्ञ मिळून अशा पोवळ्यांचा नकाशा तयार करत आहेत, जेणेकरून त्यांचे संरक्षण करता येईल. कायद्यानुसार या पोवळ्यांना हानी पोहोचवणे किंवा गोळा करणे हा गुन्हा आहे. काही देशांमध्ये याचा उपयोग औषधे आणि दागिने बनवण्यासाठी केला जातो; परंतु त्यांच्या अस्तित्वाचा धोका लक्षात घेता आता संरक्षणावर भर दिला जात आहे.