

वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या समुद्री सापाची ओळख पटवली आहे, ज्याच्या अवाढव्य आकारामुळे जगभरातील संशोधक थक्क झाले आहेत. ‘पॅलिओफिस कोलोसियस’ (Palaeophis colossaeus) असे नाव असलेला हा साप लाखो वर्षांपूर्वी समुद्रावर राज्य करत होता. हा साप आजच्या आधुनिक समुद्री सापांच्या तुलनेत कित्येक पटीने मोठा आणि शक्तिशाली शिकारी होता. अभ्यासानुसार, हा महाकाय साप 5.6 कोटी ते 3.4 कोटी वर्षांपूर्वी (इओसीन युग) अस्तित्वात होता. आजचे समुद्री साप साधारणपणे 2 ते 3 मीटर लांब असतात, मात्र पॅलिओफिस कोलोसियसची लांबी 8 ते 12 मीटर (सुमारे 26 ते 40 फूट) इतकी होती. शास्त्रज्ञांना या सापाच्या पाठीच्या कण्याचे जे अवशेष मिळाले आहेत, ते आतापर्यंत सापडलेल्या कोणत्याही सापाच्या तुलनेत असामान्यपणे मोठे आहेत.
या सापाचे अवशेष ज्या भागात सापडले, तो भाग एकेकाळी उत्तर आफ्रिकेला व्यापून असलेल्या ‘ट्रान्स-सहारा सीवे’ नावाचा उथळ समुद्र होता. आज जिथे सहाराचे वाळवंट आहे, तिथे एकेकाळी उष्ण आणि किनारपट्टीचे पाणी होते. शास्त्रज्ञांच्या मते हा साप खोल समुद्राऐवजी उथळ पाण्यात राहणे पसंत करायचा. त्या काळातील जास्त तापमानामुळे या मोठ्या सरपटणार्या जीवांना जगणे सोपे झाले होते. अन्नासाठी तो मोठ्या माशांसह शार्क आणि मगरीसारख्या दिसणार्या ‘डॉयरॉसॉरिड’ प्राण्यांची शिकार करत असावा. आजच्या काळातील सर्वात लांब समुद्री साप (पिवळा समुद्री साप) जास्तीत जास्त 3 मीटरपर्यंत वाढतो.
जमिनीवर आढळणारा आतापर्यंतचा सर्वात लांब साप ‘टायटॅनोबोआ’ (हा देखील आता नामशेष झाला आहे) याच्याशी तुलना केली असता, पॅलिओफिस कोलोसियस हा त्याला तगडी टक्कर देणारा जलचर होता. संशोधकांकडे हा साप नेमकी कशाची शिकार करायचा याचा थेट पुरावा नसला तरी, त्याच्या आकारावरून असा अंदाज लावला जातो की त्याला मोठ्या शिकारीची गरज होती. जर या सापाची कवटी आधुनिक सापांप्रमाणे लवचिक असेल, तर तो मोठ्या शार्क किंवा मगरींना अख्खे गिळंकृत करण्याची क्षमता ठेवत असावा.