Human Eye Cornea | थ्रीडी प्रिंटिंगने बनवला मानवी डोळ्यांचा कॉर्निया

जगभरातील अवयव टंचाईवर शोधला क्रांतिकारक उपाय
Human Eye Cornea |
Human Eye Cornea | थ्रीडी प्रिंटिंगने बनवला मानवी डोळ्यांचा कॉर्निया
Published on
Updated on

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत मानवी डोळ्यांचा पारदर्शक पडदा (कॉर्निया) ३डी प्रिंटरच्या साहाय्याने यशस्वीरीत्या तयार करून वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या क्रांतिकारक तंत्रज्ञानामुळे जगभरातील लाखो अंध आणि दृष्टिदोष असलेल्या रुग्णांना पुन्हा दृष्टी मिळण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे.

डोळ्याचा सर्वात पुढचा पारदर्शक भाग म्हणजे कॉर्निया. प्रकाशकिरणे डोळ्यात एकत्रित करून स्पष्ट दिसण्यासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, विविध आजार, संसर्ग (जसे की ट्रॅकोमा) किंवा दुखापतींमुळे कॉर्निया खराब होऊन व्यक्तीला अंधत्व येऊ शकते. सध्या जगभरात तब्बल १ कोटीहून अधिक रुग्ण कॉर्निया प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. कॉर्नियाला आलेल्या जखमांमुळे जगात ५० लाख लोक पूर्णपणे अंध झाले आहेत. जगभरात गरजेच्या तुलनेत प्रत्यारोपणासाठी कॉर्नियाचा मोठा तुटवडा आहे (दर ७० गरजूंमागे अवघा १ दाता उपलब्ध होतो). वैज्ञानिक गेल्या अनेक वर्षांपासून ३डी टिश्यू प्रिंटिंगसाठी योग्य अशा द्रवाची (Bio-ink) शोधमोहीम राबवत होते.

संशोधकांनी यासाठी एक विशेष बायो-इंक तयार केली आहे. या बायो-इंकमध्ये स्टेम सेल्स (मूलपेशी), अल्जिनेट आणि कोलाजन या प्रथिनांचे उत्तम मिश्रण करण्यात आले आहे. हे जेल थ्रीडी प्रिंटरच्या नोजलमधून सहज बाहेर पडू शकते आणि प्रिंट झाल्यानंतर स्वतःचा आकार टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे टणकही राहते. या तंत्रज्ञानामुळे एका मानवी कॉर्नियाचा मुख्य सांगाडा अवघ्या १० मिनिटांपेक्षा कमी वेळेत प्रिंट केला जाऊ शकतो. या संशोधनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रुग्णाच्या डोळ्याच्या आकाराप्रमाणे कॉर्निया प्रिंट करता येतो. प्रत्येक रुग्णाच्या व्यक्तिगत गरजेनुसार कॉर्नियाचे प्रिंट करता येऊ शकते. यामध्ये रुग्णाच्या डोळ्याचे डिजिटल स्कॅनिंग केली जाते. त्या डेटाचा वापर करून रुग्णाच्या डोळ्याच्या अचूक मापाचा थ्रीडी कॉर्निया प्रिंट केला जातो.

बायो-इंकमधील स्टेम सेल्स कित्येक दिवस जिवंत राहून पेशींची वाढ होण्यास मदत करतात. संशोधन पथकाचे प्रमुख प्रोफेसर चे कॉनन यांनी सांगितले, ‘‘जगभरातील अनेक संघ या प्रक्रियेसाठी योग्य बायो-इंक शोधत होते. आम्ही तयार केलेले जेल मूलपेशींना जिवंत ठेवते आणि ३डी प्रिंटिंगसाठी योग्य लवचिकता व मजबुती प्रदान करते. आता वापरकर्त्यांना पेशी वेगळ्या वाढवण्याची चिंता न करता थेट ऊती प्रिंट करता येतील.’’ हे संशोधन सध्या ‘प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट’ टप्प्यावर आहे. मानवी शरीरात प्रत्यक्षात प्रत्यारोपण करण्यापूर्वी यावर अजून सखोल चाचण्या आणि वैद्यकीय मान्यता घेणे बाकी आहे. या प्रक्रियेला काही वर्षे लागतील; परंतु हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास भविष्यात मानवी कॉर्नियाचा अमर्याद पुरवठा शक्य होईल आणि अवयवदानावरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news