

नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, भारतीय शास्त्रज्ञांनी थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून स्वदेशी बनावटीचे स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) विकसित करण्यास सुरुवात केली आहे. देशातील कानाकोपर्यात हवामानावर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा अधिक मजबूत करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या पुढच्या पिढीतील हवामान केंद्रांची पहिली तुकडी (बॅच) फेब्रुवारी महिन्यापासून राजधानी दिल्लीत स्थापित केली जाईल.
भारताची हवामान माहिती आणि अंदाज वर्तवण्याची क्षमता सुधारण्यासाठी सरकारने एक मोठी योजना आखली आहे. ‘मिशन मौसम’ असे या योजनेचे नाव असून, यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेली पुण्यातील ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’ (IITM) या योजनेचे नेतृत्व करत आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी सांगितले की, ‘आमचा उद्देश निरीक्षण यंत्रणेचा इतका विस्तार करणे आहे की, माहितीतील (डाटा) सर्व त्रुटी दूर होतील. तापमान, वारा, आर्द्रता आणि पाऊस यांसारख्या घटकांची नोंद अधिक ठिकाणांहून घेतल्यास स्थानिक पातळीवर अधिक अचूक अंदाज वर्तवणे शक्य होईल.
आम्ही दिल्लीसारख्या मोठ्या शहरांपासून याची सुरुवात करणार आहोत आणि ही सर्व केंद्रे सौरऊर्जेवर चालतील.’ ‘मिशन मौसम’ अंतर्गत विशेषतः शहरी हवामानशास्त्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या शहरांमध्ये पुढील सहा महिन्यांत स्वयंचलित हवामान प्रणाली (AWS) आणि रडार यंत्रणांचा वेगाने विस्तार केला जाणार आहे. पारंपरिक हवामान केंद्रांच्या तुलनेत ‘एडब्ल्यूएस’ हवामानाची माहिती स्वयंचलितपणे मोजते आणि पाठवते.
यामुळे कामकाजाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो. तथापि, या यंत्रणांचे वेळोवेळी ‘कॅलिब्रेशन’ (तपासणी) आणि देखभाल करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अचूकतेचे महत्त्व प्रकर्षाने समोर आले होते, जेव्हा भारतीय हवामान विभागाच्या (IMD) काही स्वयंचलित केंद्रांनी अतिशय उच्च तापमानाची नोंद केली होती. नंतर तपासात असे आढळले की, त्यांचे सेन्सर खराब झाले होते किंवा त्यांची स्थापना चुकीच्या ठिकाणी करण्यात आली होती.