3D Printed Elephant Robot | बॉलिंग खेळणारा ‘रोबोटिक हत्ती’

थ्रीडी प्रिंटिंगची कमाल
3d-printed-elephant-robot
Robotic Elephant | बॉलिंग खेळणारा ‘रोबोटिक हत्ती’ Pudhari File Photo
Published on
Updated on

जिनिव्हा : स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यांनी थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून एक असा रोबोटिक हत्ती तयार केला आहे, जो जैविक ऊतींप्रमाणे काम करतो. हा हत्ती नाजूकपणे फुले उचलू शकतो आणि चक्क बॉलिंगही खेळू शकतो, असं एका नवीन अभ्यासात म्हटलं आहे.

स्वित्झर्लंडच्या संशोधकांनी एक ‘प्रोग्रामेबल लॅटिस स्ट्रक्चर’ विकसित केलं आहे. हे स्ट्रक्चर वेगवेगळ्या स्वरूपात बदलू शकतं. यामुळे रोबोला एक लवचिक कृत्रिम सोंड मिळाली आहे, जी नाजूक कामं हाताळू शकते. तर दुसरीकडे, त्याच्या पायांमध्ये हाडांसारखा कठीण आधार देण्यात आला आहे, ज्यामुळे त्याची हालचाल अधिक नैसर्गिक वाटते.

प्रात्यक्षिकातून सिद्ध केली क्षमता

आपल्या संशोधनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी संशोधकांनी या रोबोटिक हत्तीचे काही प्रात्यक्षिक दाखवले. यात हत्ती आपल्या सोंडेने नाजूकपणे एक फूल उचलतो आणि बॉलिंग बॉलला किक मारतो. संशोधकांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये, या रोबोटिक हत्तीने एका छोट्या बॉलिंग बॉलला किक मारून 10 पैकी 7 पिन्स पाडल्याचे दिसून येते.

हे लॅटिस फोमपासून बनवलेले आहे आणि त्यात अनेक लहान युनिटस् किंवा ‘सेल्स’ आहेत. संशोधक या सेल्सना वेगवेगळ्या आकारात आणि स्थितीत प्रोग्राम करू शकतात. टीमच्या दाव्यानुसार, या तंत्रज्ञानामुळे दहा लाखांहून अधिक विविध कॉन्फिगरेशन्स शक्य आहेत, ज्यामुळे ‘अनंत’ भौमितिक भिन्नता (geometric variations) तयार करता येतात. यामुळे हलके आणि परिस्थितीनुसार जुळवून घेणारे रोबो डिझाईन करणे शक्य होईल, असे ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे.

रोबोटिक्सच्या भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल

‘आम्ही आमच्या प्रोग्रामेबल लॅटिस तंत्राचा वापर करून स्नायू आणि सांगाड्यापासून प्रेरित एक रोबोटिक हत्ती तयार केला आहे. याला एक मऊ सोंड आहे जी वळू शकते, वाकू शकते आणि फिरू शकते. तसेच, त्याचे नितंब, गुडघे आणि पायांचे सांधे अधिक मजबूत आहेत,’ असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि स्वित्झर्लंडच्या ईपीएफएल विद्यापीठातील कॉम्प्युटेशनल रोबो डिझाईन अँड फॅब्रिकेशन लॅबचे पोस्टडॉक्टरल संशोधक किंगहुआ गुआन यांनी एका निवेदनात म्हटले. यावरून हे सिद्ध होते की, ‘आमची पद्धत अत्यंत हलके आणि जुळवून घेणारे रोबो डिझाईन करण्यासाठी एक प्रभावी उपाय देऊ शकते.’

सध्याचे अत्याधुनिक मानवासारखे दिसणारे रोबोसुद्धा मानव आणि इतर प्राण्यांच्या तुलनेत खूपच अडखळत आणि विचित्र पद्धतीने हालचाल करतात. आपल्या शरीरातील विविध हालचाली या स्नायू, टेंडन्स, लिगामेंटस् आणि हाडे यांच्या एकत्रित आणि गुंतागुंतीच्या कार्यामुळे शक्य होतात. हीच गुंतागुंत रोबोंमध्ये तयार करणे अत्यंत कठीण मानले जाते, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे या समस्येवर मात करून अधिक नैसर्गिक हालचाली करणारे रोबो बनवण्याचा मार्ग मोकळा झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news