

मानवी इतिहासाच्या बहुतांश काळात, नकाशांनी जगाला सपाट रूपात मांडले. शहरे केवळ बाह्यरेखा बनली, इमारती रंगीत ठोकळ्यांमध्ये बदलल्या आणि संपूर्ण परिसर चिन्हांपुरता मर्यादित राहिला. ही मर्यादा आता एका विलक्षण वैज्ञानिक प्रयत्नाद्वारे मोडीत काढली जात आहे, ज्यामध्ये पृथ्वीवरील अंदाजे 2.75 अब्ज इमारतींचे त्रिमितीय (थ्रीडी) मॅपिंग करण्यात आले आहे.
ग्लोबल बिल्डिंग अॅटलसनावाचा हा प्रकल्प एक संवादात्मक जागतिक नकाशा सादर करतो, जिथे तुम्ही पृथ्वीवर कुठेही झूम करून पाहू शकता आणि अनेकदा स्वतःचे घरही शोधू शकता. इमारती फक्त कुठे आहेत हे दाखवण्याऐवजी, त्या जमिनीपासून कशा उंचावल्या आहेत, हे हा नकाशा दर्शवतो. गजबजलेली शहर केंद्रे अचानक उभ्या सिमेंटच्या जंगलांसारखी दिसू लागतात, तर लहान शहरे आणि ग्रामीण भागातील घरांची कमी उंची आणि विस्तार स्पष्ट होतो. शहरांचे स्वरूप आता अमूर्त न राहता चटकन समजण्याजोगे झाले आहे.
थ्रीडी मॅपिंग कसे झाले?
प्रत्येक इमारतीकडे वैयक्तिकरीत्या जाऊन पाहणे शक्य नाही. हे सोडवण्यासाठी संशोधकांनी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सॅटेलाईट फोटोंचा आधार घेतला. इमारतींच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी आणि त्यांच्या उंचीचा अंदाज घेण्यासाठी उच्च-रिझोल्यूशन सॅटेलाईट फोटोंच्या प्रचंड डेटावर या प्रणालींना प्रशिक्षित करण्यात आले.
इमारतीची संभाव्य उंची सांगण्यासाठी ही प्रणाली सावल्या, भूप्रदेशाची रचना आणि जवळच्या वास्तूंचे संकेत तपासते. जागतिक उंचीच्या डेटाशी सांगड घालून, मूलभूत थ्रीडी आकार तयार केले जातात. वैज्ञानिक याला लेव्हल ऑफ डिटेल 1मॉडेल म्हणतात: यामध्ये इमारतीचे सौंदर्य किंवा नक्षीकाम दिसत नाही. परंतु, पाऊलखुणा, उंची आणि आकारमानाचे अचूक मोजमाप मिळते. यामध्ये जगातील अंदाजे 97 टक्के इमारतींचा समावेश आहे, ज्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात तपशीलवार जागतिक बिल्डिंग डेटासेट ठरला आहे. तितकेच महत्त्वाचे म्हणजे, हा डेटा सर्वांसाठी खुला आणि उपलब्ध आहे; संशोधक, नियोजक आणि संस्था याचा मोफत वापर करू शकतात.