गरजेशिवाय खरेदीची सवय ‘केमिकल लोच्या’ ! | पुढारी

गरजेशिवाय खरेदीची सवय ‘केमिकल लोच्या’ !

न्यूयॉर्क ः गरज असेल तर खरेदी करणे ही एक सर्वसामान्य बाब आहे. सणासुदीला ज्या उत्साहाने माणसं खरेदी करीत असतात ते पाहून पु.ल. देशपांडे यांनी एकदा म्हटले होते की ‘माणूस म्हणजे खरेदीत आनंद मानणारा प्राणी, अशी एक नवी व्याख्या करावी लागेल!’ मात्र गरज नसतानाही बेसुमार खरेदी करण्याची सवय असेल तर ही एक मानसिक समस्या आहे असे ओळखावे. मेंदू एक प्रकारचा डोपामाईन उत्सर्जित करतो जो खरेदीसाठी प्रवृत्त करतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

काहीवेळा अन्य एखाद्या आजारावरील उपचारासाठी खाल्ल्या जाणार्‍या औषधांमुळेही डोपामाईन उत्सर्जित होत असते. पार्किन्सन म्हणजेच कंपवातासारख्या आजारावरील औषधांमुळेही डोपामाईन उत्सर्जित होण्याची शक्यता असते. यामुळे खरेदी करण्यासाठी माणूस प्रवृत्त होत असतो. यामागे अन्यही काही कारणे असू शकतात. अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील न्यूरोसर्जन ऐन क्रिस्टीने दुहैम यांनी आपल्या ‘माईंडिंग क्लायमेटः हाऊ न्यूरोसायन्स कॅन हेल्प सॉल्व्ह अवर एन्व्हायर्नमेंटल क्रायसिस’ या पुस्तकात म्हटले आहे की विनाकारण खरेदीच्या सवयीचे दुसरे कारण आपल्या पालनपोषणाची पद्धत आहे.

एखादी व्यक्ती कोणत्या वातावरणात वाढली आहे व तिने लहानपणी खरेदीकडे कशाप्रकारे पाहिले आहे यावरही ही सवय अवलंबून असते. जर एखाद्याने लहानपणी ऐकले असेल की वारंवार खरेदी केल्याने माणूस कंगाल बनू शकतो, तर हा माणूस मोठेपणी अधिक खरेदी करणार नाही. जर कुणी लहानपणी ऐकले असेल की अधिक खर्च करून चांगले जीवन जगता येते, तर तो मोठेपणी खरेदीसाठी पैशाची उधळपट्टी करू शकतो. खरेदीची सवय असलेल्या माणसाने स्वयंसूचना देऊन ही सवय कमी करणे गरजेचे असते.

Back to top button