

रोम : इटलीतील एका निद्रिस्त ज्वालामुखीय तलावात पुरातत्त्वशास्त्रज्ञांना अतिशय उत्तम स्थितीत असलेली एक प्राचीन कांस्ययुगीन तलवार सापडली आहे. सुमारे ३,३०० वर्षांपूर्वीचे हे शस्त्र एट्रस्कन (Etruscans) किंवा रोमन साम्राज्याच्या उदयाच्या कितीतरी आधीचे आहे. एखाद्या देवतेला अर्पण करण्यासाठी किंवा उच्च दर्जाच्या योद्ध्यासाठी ही तलवार या तलावात विसर्जित केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘वितेर्बो आणि दक्षिण एट्रुरिया प्रांताच्या’ पुरातत्त्व, ललित कला व भूदृश्य अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही तलवार रोमच्या वायव्येला सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘लेक मेझाना’ या प्राचीन ज्वालामुखीय तलावात सापडली. उत्तर कांस्ययुगातील (ख्रिस्तपूर्व १४ वे ते १३ वे शतक) असलेली ही तलवार अजूनही तितकीच धारदार आहे. गेल्या ५० वर्षांत या तलावात सापडलेली ही अशा प्रकारची तिसरी तलवार ठरली आहे. कांस्ययुगात लोकांनी सध्याच्या लेक मेझाना भागात लाकडी खांबांवरील घरे (Stilt houses) उभारली होती. नुकत्याच झालेल्या उत्खननादरम्यान पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या पाण्याखाली गेलेल्या वस्तीचे काही अवशेष बाहेर काढले आहेत.
या संशोधनादरम्यान तलवारीव्यतिरिक्त अनेक अखंड मातीची भांडी, कुऱ्हाडी, बाणांची टोके, कट्यारी, भाले, पिन आणि कांस्य धातूचा वस्तरा यासारख्या वस्तूही सापडल्या आहेत. विशेष म्हणजे, तलवार आणि वस्तरा एकमेकांच्या जवळच सापडले आहेत. यावरून हे दोन्ही अवशेष एखाद्या उच्च सामाजिक दर्जा असलेल्या व्यक्तीशी किंवा श्रेष्ठ योद्ध्याशी संबंधित असावेत, असा निष्कर्ष काढला जात आहे. याशिवाय, कांस्ययुगात दागिने आणि दुमडलेली किंवा विधीपूर्वक निष्प्रभ केलेली शस्त्रास्त्रे जलाशयांमध्ये अर्पण करण्याची व्यापक धार्मिक प्रथा होती. हा त्याचाही एक भाग असण्याची शक्यता आहे. ही प्रथा पुढे एट्रस्कन काळातही सुरू राहिली; ज्यामध्ये विहिरींमध्ये मानवी बळी देऊन व वस्तू अर्पण करून त्या विधीपूर्वक बंद केल्या जात असत.