

प्राग : झेक रिपब्लिकमधील एका बागेत, जुन्या गोठ्याच्या पायासाठी वापरलेला एक साधा आयताकृती दगड प्रत्यक्षात कांस्य युगातील एक अत्यंत दुर्मीळ ‘साचा’ असल्याचे समोर आले आहे. हा साचा 3,300 वर्षांपूर्वी भाले तयार करण्यासाठी वापरला जात असे, असे एका नवीन संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
2025 मध्ये ‘आर्किओलॉजिक रोझलेडी’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, हा साचा इसवी सन पूर्व 1350 मधील आहे. सुमारे 9 इंच लांब आणि 1.1 किलोग्रॅम वजनाचा हा साचा ‘र्हीयोलाईट टफ’ नावाच्या ज्वालामुखी खडकापासून बनवण्यात आला आहे. झेक रिपब्लिकमधील मोरावियन म्युझियमचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक मिलान सालाश यांच्या मते, ‘हा मध्य युरोपातील कांस्य युगातील भाल्यांचे पाते तयार करण्यासाठीचा सर्वात सुरक्षित आणि परिपूर्ण साचा आहे.’ हा साचा उत्तर हंगेरीमधून दक्षिण मोरावियामध्ये आयात करण्यात आला असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे.
या साच्याचे स्वरूप ‘अर्णफील्ड’ संस्कृतीशी जुळते. ही संस्कृती मृतांच्या अस्थी कलशात भरून शेतात गाडण्याच्या प्रथेसाठी ओळखली जात असे. संशोधकांच्या मते, अशा प्रकारच्या साच्यांमुळे एकाच आकाराची आणि वजनाची शस्त्रे (भाले, कुर्हाडी, खंजीर) मोठ्या प्रमाणात तयार करणे शक्य झाले. या साच्याचा वापर अत्यंत तीव्रतेने करण्यात आला होता. यातून डझनभर भाले तयार केले गेले असावेत. यामुळे युद्धासाठी लागणार्या शस्त्रांचा पुरवठा सोपा झाला, ज्यामुळे कार्पेथियन बेसिनमधील संस्कृतींची व्यापार आणि राजकीय शक्ती वाढली.
2007 मध्ये जे. टोमॅनेक नावाच्या व्यक्तीला आपल्या बागेतील जमिनीतून एक राखाडी रंगाचा दगड थोडा बाहेर आलेला दिसला. 2019 मध्ये त्यांनी हा दगड तपासणीसाठी मोरावियन म्युझियमकडे सुपूर्द केला. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी जेव्हा X- ray Fluorescence (XRF) स्कॅनिंगद्वारे याची तपासणी केली, तेव्हा त्यात काही धक्कादायक गोष्टी आढळल्या : या साच्यात खरोखरच कांस्य धातू ओतून शस्त्रे बनवली गेली होती. साच्याचे दोन भाग एकत्र धरून ठेवण्यासाठी तांब्याच्या तारेचा वापर केला जात असे, असे पुरावेही स्कॅनिंगमध्ये सापडले आहेत.