

तेल अवीव : इस्रायलमधील अरमॅगेडॉन (प्राचीन मेगिद्दो शहर) या प्राचीन शहराजवळ उत्खनन करताना, पुरातत्त्वशास्त्रज्ञांना 3,300 वर्षे जुना कनानी ‘चहाचा सेट’, बाहुल्यांच्या घराच्या आकाराचे एक मंदिर आणि जगातील सर्वात जुन्या द्राक्षरस काढण्याच्या घाण्यांपैकी एक सापडला आहे. उत्तर कांस्ययुगात एकत्र पुरलेल्या या ‘चहाच्या सेट’मध्ये मेंढ्याच्या आकाराचे टीपॉट आणि काही लहान वाडगे समाविष्ट आहेत. टीपॉटच्या नळीवर मेंढ्याचे डोके कोरलेले आहे. द्रव पदार्थ मेंढ्याच्या तोंडातून बाहेर पडावा, यासाठी हे डोके थोडे पुढे झुकलेले होते.
इस्रायल पुरातन वस्तू प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनात संशोधकांनी म्हटले आहे की, ‘हे भांडे दूध, तेल, द्राक्षारस किंवा इतर कोणतेही मौल्यवान पेय ओतण्यासाठी बनवले असावे. ते थेट नळीतून प्यायले जाऊ शकते, किंवा पिण्यासाठी लहान भांड्यात ओतले जाऊ शकते किंवा ते धार्मिक कार्यासाठी अर्पण म्हणून वापरले जाऊ शकते.’ मेंढी, गाढवे आणि शेळ्यांसारखे प्राणी कनानमध्ये अत्यंत मौल्यवान मानले जात होते आणि कनानी लोकांनी हे टीपॉट आणि वाडगे धार्मिक विधींसाठी अर्पण म्हणून पुरले असावेत.
उत्खननादरम्यान सापडलेले, मातीचे (सिरॅमिक) बनवलेले मिनी-मंदिर देखील 3,300 वर्षे जुने आहे. ‘आयएए’चे उत्खनन संचालक आमिर गोलानी यांनी सांगितले की, ‘कनानी उत्तर कांस्ययुगातील खरी मंदिरे कशी दिसत असतील, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.’ या उत्खननात अनेक लहान खड्ड्यांमध्ये साठवणुकीसाठी वापरले जाणारे रांजण आणि सायप्रसवरून आयात केलेले जग यांसारखी इतर कनानी धार्मिक अर्पणे देखील सापडली. जे लोक शहरात किंवा जवळच्या मेगिद्दो टेकडीवरील कनानी मंदिरात प्रवेश करू शकत नव्हते, अशा स्थानिक लोकांनी, उदा. शेतकर्यांनी, ही अर्पणे पुरली असावीत. मंदिरात प्रवेश न मिळाल्याने, त्यांनी खडकाच्या उंचवट्यावर ही अर्पणे आणि कदाचित शेतीत पिकवलेला मालही पुरला असावा, जो मैदानी वेदी म्हणून वापरला जात असावा, असे निवेदनात नमूद आहे.