हृदयाची देखरेख करणारा शर्ट | पुढारी

हृदयाची देखरेख करणारा शर्ट

न्यूयॉर्क : हृदयावर लक्ष ठेवण्यासाठीचे एक सहज हाताळता येणारे उपकरण म्हणून स्मार्टवॉच बनवण्यात आले होते. आता अशा स्मार्टवॉचलाही संशोधकांनी पर्याय निर्माण केला आहे. टेक्सासच्या राईस युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी असा स्मार्ट टी-शर्ट विकसित केला आहे जो माणसाच्या हृदयाची देखरेख करतो. वैज्ञानिकांचा दावा आहे की स्मार्ट टी-शर्ट हा चेस्ट स्ट्रेपपेक्षाही चांगले काम करतो.
हा टी-शर्ट सकृतदर्शनी एखाद्या सामान्य टी-शर्टसारखाच दिसतो. मात्र, अतिशय पातळ कार्बन नॅनोट्यूब फायबरने विणून त्याचे कापड बनवण्यात आलेले आहे.

या नॅनोट्यूब फायबर एखाद्या मेटल फायबरप्रमाणेच काम करतात आणि चांगली कंडक्टिव्हिटी देतात. हे कापड सहजपणे धुताही येऊ शकते. अशा कापडापासून बनवलेला स्मार्ट टी-शर्ट नॅनो-फायबरच्या मदतीने हृदयाच्या ठोक्यांबाबतची माहिती देऊ शकतो. हृदयाचे ठोके नीट होत आहेत की नाहीत हे यामुळे समजू शकते.

नॅनोट्यूब फायबरपेक्षा मोठे असल्याने या कापडात अँटिना किंवा एलईडीही लावता येऊ शकेल. तसेच टी-शर्टमध्ये थोडा बदल करून त्याच्या मदतीने माणसाच्या श्‍वास घेण्याच्या गतीवरही नजर ठेवता येईल. राईस युनिव्हर्सिटीच्या इंजिनिअर मेटिओ पासकुआली यांनी सांगितले की या कापडात कंडक्टिव्हिटी चांगली असते. हा टी-शर्ट परिधान केल्यावर कोणतीही असुविधा वाटत नाही.

Back to top button