तीनचाकी कारमधून करा गगनाची सफर | पुढारी

तीनचाकी कारमधून करा गगनाची सफर

वॉशिंग्टन ः जीवनात एकदा तरी विमानातून प्रवास करावा असे अनेकांचे स्वप्न असते. पण थांबा, आता स्वतःच्या मोटारीतूनही गगनाला गवसणी घालणे शक्य होणार आहे. यासाठी अमेरिकेच्या सॅमसन स्कायने अशी मोटार प्रायोगिक तत्त्वावर तयार केली आहे. विशेष म्हणजे ही मोटार तीनचाकी आहे. जगातील पहिल्या फ्लाईंग कारच्या चाचण्यांना अमेरिकेच्या ‘फेडरल एव्हिएशन डमिनिस्ट्रेशन’कडून (एफएए) नुकतीच परवानगी मिळाली आहे.

‘स्विचब्लेड’च्या अनेक चाचण्या घेण्यात येणार आहेत. जमिनीवर सामान्य मोटारीप्रमाणे तर हवेत उड्डाण करूनही चाचण्या घेतल्या जातील. कंपनी गेल्या 14 वर्षांपासून या मोटारीवर संशोधन करीत आहे. ही अनोखी कार प्रतितास 322 किलोमीटर वेगाने उडू शकते. शिवाय, तिचा जमिनीवरील वेग 201 कि.मी. प्रतितासापर्यंत नेता येईल. मोटारीची लांबी 5.1 मीटर व रुंदी 1.8 मीटर असल्यामुळे तुम्ही ती घरातील गॅरेजमध्येही सहज ठेवू शकता. हवेतून जमिनीवर उतरल्यानंतर चालविण्याच्या पद्धतीत तातडीने बदल करता येईल. निळ्या आकाशात उडण्यासाठी विमानतळावर नेल्यानंतर मोटारीचे पंख व शेपटाकडील भाग उघडवा लागेल.

विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला लागतील केवळ तीन मिनिटे. एकदा टाकीत 113 लिटर इंधन घातले की, तुम्हाला 724 किलोमीटरपर्यंत आरामात जाता येईल. या कारची खासियत म्हणजे जमिनीपासून हवेत ती 4 कि.मी.पर्यंतची उंची गाठू शकेल. आताच या कारची लोकप्रियता एवढी शिगेला पोहोचली आहे की, चाचणी होण्यापूर्वीच अमेरिकेतील 50 राज्यांसह 52 देशांतील दोन हजार 100 लोकांनी तिची नोंदणीसुद्धा करून टाकली आहे.

Back to top button