30000-year-old-ice-age-horse-skull-discovered
हिमयुगातील घोड्याच्या तब्बल 30,000 वर्षांपूर्वीच्या कवटीचा शोधPudhari File Photo

हिमयुगातील घोड्याच्या तब्बल 30,000 वर्षांपूर्वीच्या कवटीचा शोध

Published on

युकॉन : संशोधकांना कॅनडाच्या युकॉन भागातील एका खाणीत एक मोठा खजिना सापडला आहे. हा खजिना म्हणजे सुमारे 30,000 वर्षांपूर्वीच्या हिमयुगातील एका घोड्याची उत्तम प्रकारे जतन केलेली कवटी आहे. या शोधामुळे हिमयुगातील जीवसृष्टीवर नवीन प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

क्लोंडाईक प्रदेशातील एका खाणीत काम सुरू असताना संशोधकांना ही कवटी आढळून आली. सुरुवातीला या कवटीचा फक्त जबड्याचा काही भाग आणि डोक्याचा वरचा भाग गोठलेल्या जमिनीतून बाहेर डोकावत होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संशोधकांची टीम दुसर्‍या दिवशी अधिक उपकरणे आणि गरम पाणी घेऊन परतली. या कामात खाण कामगारांनीही मोलाची मदत केली. त्यांनी पाण्याच्या मोठ्या नळ्यांनी बर्फ वितळवून ही ‘सुंदररीत्या जतन झालेली’ कवटी अलगद बाहेर काढण्यास मदत केली, अशी माहिती युकॉन बेरिंगिया इंटरप्रिटिव्ह सेंटर या संग्रहालयाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दिली आहे.

युकॉन पॅलेओंटोलॉजी प्रोग्रामच्या प्रवक्त्याच्या मते, कवटीच्या सभोवतालची माती आणि गाळाच्या खोलीवरून हा घोडा सुमारे 30,000 वर्षांपूर्वी जगला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, रेडिओकार्बन डेटिंगनंतरच याचे अचूक वय निश्चित करता येईल. तज्ज्ञांच्या मते, हिमयुगातील घोड्यांच्या 50 हून अधिक प्रजाती आतापर्यंत ओळखल्या गेल्या आहेत; पण ही कवटी नेमक्या कोणत्या प्रजातीची आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कॅमेरॉन वेबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कवटीची रचना आणि दातांचा आकार यावरून त्याच्या उत्क्रांतीबद्दल काही अंदाज बांधता येतात. परंतु, ‘डीएनए’ विश्लेषणाशिवाय या घोड्याची नेमकी प्रजाती ओळखणे अशक्य आहे.’ त्यांनी सांगितले की, युकॉनमधील हिमयुगातील घोडे तुलनेने लहान होते आणि त्यांची उंची खांद्यापर्यंत अंदाजे 4 फूट (1.2 मीटर) होती.

क्लोंडाईक प्रदेशातील खाणीत सापडलेली ही कवटी केवळ एक जीवाश्म नाही, तर हिमयुगातील एका अज्ञात अध्यायाचे प्रवेशद्वार आहे. पुढील ‘डीएनए’ विश्लेषण आणि इतर वैज्ञानिक चाचण्यांमधून या घोड्याच्या प्रजातीबद्दल आणि तत्कालीन पर्यावरणाबद्दल अधिक मौल्यवान माहिती समोर येईल, अशी आशा संशोधकांना आहे. हा शोध हिमयुगातील जीवसृष्टीच्या अभ्यासात एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news