

कीव्ह : जमिनीखाली दडलेली रहस्ये अनेकदा उत्खननातून समोर येतात; पण युक्रेनमधील एका ऐतिहासिक किल्ल्याच्या उत्खननात जे सापडले, त्याने सर्वांनाच चकित केले आहे. पश्चिम युक्रेनमधील हॅलिच शहरातील गॅलिशियन किल्ल्यात (ज्याला स्टारास्ता किल्ला म्हणूनही ओळखले जाते) तब्बल 300 वर्षांपासून बंद असलेले एक गुप्त तळघर सापडले आहे. या शोधाने शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे; कारण हा कक्ष त्या युद्धाच्या काळाची आठवण करून देतो, जेव्हा तुर्कांनी या किल्ल्यावर हल्ला केला होता.
युक्रेनच्या नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या पुरातत्त्व विभागाचे पथक जेव्हा किल्ल्याच्या एका जुन्या टॉवरच्या अवशेषांची तपासणी करत होते, तेव्हा त्यांना एक व्हेंटिलेशन शाफ्ट (हवा येण्या-जाण्यासाठी असलेली नळी) दिसली. ही नळी इतकी अरुंद होती की, त्यातून कोणीही आत जाऊ शकत नव्हते. यानंतर, किल्ल्याच्या रचनेला धक्का लागू नये म्हणून पथकाने सुमारे 5,200 घनफूट ढिगारा हाताने हटवला. अखेर अनेक आठवड्यांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना हा गुप्त कक्ष सापडला. हा कक्ष म्हणजे एक ‘कॅसमेट’ होता, जिथे शस्त्रे ठेवली जात किंवा तोफा डागल्या जात.
त्याच्या भिंतींवर काळे डाग सापडले आहेत, जे कदाचित तोफेतून निघालेल्या धुरामुळे तयार झाले असावेत. खोलीत व्हेंटिलेशन शाफ्ट असल्याने, तेथे धूर बाहेर काढण्याची व्यवस्था असल्याचे स्पष्ट होते. असा अंदाज वर्तवला जात आहे की, 1676 मध्ये झालेल्या तुर्की-पोलिश युद्धादरम्यानच्या हल्ल्यात हा कक्ष ढिगार्याखाली गाडला गेला आणि त्यानंतर तो कोणाच्याही नजरेस पडला नाही. गॅलिशियन किल्ला सुरुवातीला लाकडी होता, जो 14 व्या शतकात राजा कॅसिमिर तिसरा (King Casimir III) याने मजबूत दगडांनी पुन्हा बांधला. 17 व्या शतकात त्याचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, तुर्कांच्या हल्ल्यात त्याचे मोठे नुकसान झाले आणि अनेक भाग गाडले गेले.