

ओटावा : कॅनडातील ओन्टारियो प्रांतातील मरीनलँड पार्कमध्ये असलेल्या 30 बेलूगा व्हेल्सना आर्थिक टंचाईमुळे इच्छामृत्यू द्यावा लागू शकतो, अशी धक्कादायक शक्यता निर्माण झाली आहे. पार्कने काही महिन्यांपूर्वी या व्हेल्सना चीनला विकण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली होती; मात्र चीनमधील थीम पार्कमध्येही प्राण्यांवर अन्याय होण्याची शक्यता लक्षात घेऊन फेडरल सरकारने परवानगी नाकारली.
त्यानंतर मरीनलँड प्रशासनाने सांगितले की, प्राण्यांची देखरेख करणे त्यांच्यासाठी परवडणारे नाही, म्हणून पर्याय न मिळाल्यास इच्छामृत्यू हा मार्ग उरेल. या विधानावरून संताप व्यक्त होत असून सरकार, पशूसंवर्धन संस्था आणि तज्ज्ञ या प्राण्यांना वाचवण्यासाठी पर्याय शोधत आहेत. मरीनलँडमध्ये 2019 नंतर 20 व्हेल्सचा मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत. पाण्याच्या खराब गुणवत्तेमुळे व प्राण्यांच्या दुर्लक्षामुळे या व्हेल्सना जीव गमवावा लागल्याच्या असंख्य तक्रारी पुढे आल्या. 1961 साली स्थापन झालेले हे उद्यान काही काळ लोकप्रिय होते, पण आर्थिक तोट्यामुळे आणि प्राणी कल्याणाकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारींमुळे या उद्यानाची प्रतिमा बिघडली.
ओन्टारियो प्रांतातील पशुकल्याण कायद्यानुसार सरकारला व्हेल्स जप्त करून त्यांची काळजी घेण्याचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांचे मत आहे की, मुख्यमंत्री डग फोर्ड यांनी त्वरित हस्तक्षेप करावा. काही संस्थांनी नोव्हा स्कोशियातील व्हेल अभयारण्यात काही व्हेल्सना हलविण्याचा प्रस्ताव दिला आहे, पण तिथे सध्या केवळ 8 ते 10 व्हेल्सच स्वीकारल्या जाऊ शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की इच्छामृत्यूचा धोका वास्तवापेक्षा दबाव तंत्राचा भाग असू शकतो, मात्र बेलूगा व्हेल्सना लवकर पर्यायी निवारा देणे अत्यावश्यक आहे.