

तेल अवीव : इस्रायलमध्ये आपल्या कुटुंबासोबत फिरत असताना एका 3 वर्षांच्या मुलीला 3,800 वर्षे जुना व दुर्मीळ ‘स्कॅरब’ नावाचा मजकूर किंवा चिन्हे कोरलेला दगड सापडला. झिव नित्झान या चिमुकलीने मार्च महिन्यात तेल अझेका येथे हा ऐतिहासिक शोध लावला. तेल अझेका हे एक पुरातत्त्वीय स्थळ असून, तिथे कांस्ययुगाच्या काळापासून वस्ती होती. फिरत असताना, तिला माती आणि गोट्यांनी भरलेल्या रस्त्यावर एक ‘वेगळा दगड’ दिसला!
‘सुमारे 7,000 दगडांमध्ये तिने हा एक विशिष्ट दगड उचलला,’ असे झिवची मोठी बहीण ओमर नित्झान हिने इस्रायल अँटिक्विटीज ऑथोरिटीद्वारे प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत सांगितले. तिने त्यावरील माती झटकली आणि काहीतरी वेगळे असल्याचे तिला जाणवले. झिवच्या आई-वडिलांनीही हा ‘सुंदर दगड‘ पाहिला आणि लगेचच त्यांनी ‘आयएए’ ला याबाबत माहिती दिली. पुरातत्त्वज्ञांनी तपास केल्यानंतर असे निष्पन्न झाले की, हा मध्य कांस्ययुगातील एक कनानी स्कॅरब आहे. प्राचीन ग्रंथांनुसार, कनान हा प्रदेश सध्याच्या इस्रायल, पॅलेस्टिनी प्रदेश, लेबनॉन, सीरिया आणि जॉर्डनच्या काही भागांमध्ये पसरलेला होता. ‘त्या काळात स्कॅरब हे ताईत आणि शिक्क्यांसाठी वापरले जात असत,’ असे इस्रायल म्युझियममधील प्राचीन ताईत आणि शिक्केतज्ज्ञ डाफ्ना बेन-टोर यांनी सांगितले. हे सार्वजनिक इमारतींमध्ये, खासगी घरांमध्ये आणि थडग्यांमध्ये सापडले आहेत. काहींवर धार्मिक श्रद्धा किंवा सामाजिक स्थान दर्शवणारी चिन्हे आणि संदेश कोरलेले असतात.‘हा शोध प्राचीन इजिप्त आणि कनानी संस्कृतीतील जवळच्या संबंधांचेही निदर्शन घडवतो.
स्कॅरब ताईत हे छोटे आणि नाजूक नक्षीदार दगड असून, ते गोमेद गोंधळ्याच्या (डंग बीटल - Scarabaeus sacer) आकारासारखे तयार केले जात असत. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत हे कीटक नवीन जीवनाचे प्रतीक मानले जात. डंग बीटल मातीला गोल आकार देऊन ते फिरवतो. प्राचीन इजिप्शियन लोकांना यावरून सूर्यदेव आपल्या रथाने सूर्याला आकाशातून फिरवतो, असा समज झाला. याशिवाय, या कीटकांची जणू काही अचानक निर्मिती होते, या चुकीच्या समजुतीमुळे इजिप्शियन लोकांनी त्याला सृष्टीचा देव खेप्री याच्याशी संबंधित मानले. टेल अझेका येथे गेल्या 15 वर्षांपासून उत्खनन सुरू असून, तेल अवीव विद्यापीठातील पुरातत्त्व विभागाचे संचालक प्रो. ओदेद लिप्शिट्झ यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले आहे.