

पोर्टलँड, ओरेगॉन : पृथ्वी सपाट असल्याचा दावा करणार्या फ्लॅट अर्थ सिद्धांत मानणार्यांसाठी अमेरिकेतील एका अब्जाधीश उद्योगपतीने आयुष्यभराची सर्वोत्तम संधी जाहीर केली आहे. कोलंबिया स्पोर्टवेअर कंपनीचे 76 वर्षीय सीईओ टिम बॉयल यांनी एक अनोखी स्पर्धा सुरू केली आहे. टिम बॉयल यांनी फ्लॅट अर्थर्सना आव्हान दिले आहे की, त्यांनी पृथ्वीची खरी किनार शोधून काढावी आणि त्या अथांग दरीचा फोटो काढून आणावा. जर त्यांनी हे सिद्ध केले, तर बॉयल त्यांची 3 अब्ज डॉलर्सची कौटुंबिक कंपनी त्या विजेत्याच्या हवाली करतील.
एक्सपेडिशन इम्पॉसिबल या नवीन मार्केटिंग मोहिमेचा भाग म्हणून बॉयल यांनी हा संदेश दिला. ते म्हणाले, फ्लॅट अर्थर्ससाठी हा संदेश आहे. तुम्ही दावा करता की, पृथ्वीला शेवट आहे. फक्तजा, एक फोटो काढा, आम्हाला पाठवा आणि कंपनीची मालमत्ता मिळवा. बॉईल यांनी यात कोणतेही कायदेशीर अडथळे नसल्याचे सांगितले असले, तरी जाहिरातीत लगेच त्यांच्या वकिलांनी हजर होत एक फाईन प्रिंट समाविष्ट केली. बॉयल यांनी कंपनीचा मुख्य भाग नाही, तर द कंपनी, एलएलसी नावाची एक वेगळी उपकंपनी बक्षीस म्हणून ठेवली आहे, जिची मालमत्ता अजूनही 1 लाख डॉलर्स इतकी आहे. त्यामुळे मुख्य कंपनी मिळाली नसली तरी, विजेत्याला चांगली रक्कम मिळू शकते.
वैज्ञानिक पुरावे आणि वाद
मानवाला प्राचीन काळापासून पृथ्वी गोल असल्याचे माहीत आहे. अवकाश मोहिमा, उपग्रह आणि अगदी क्षितिजावर जहाजे अद़ृश्य होण्यासारखे साधे निरीक्षण पृथ्वी गोल असल्याचे सिद्ध करतात. तरीही, फ्लॅट अर्थ सिद्धांत मानणारे लोक या पुराव्यांना षड्यंत्र किंवा फेक मानतात. नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीचे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. इयान व्हिटेकर यांच्या मते, आपण जमिनीवर असताना पृथ्वीचा वक्र भाग दिसत नाही. कारण, आपला आकार पृथ्वीच्या वक्रतेच्या तुलनेत नगण्य आहे.