पुन्हा सापडला दुर्मीळ निळा खेकडा! | पुढारी

पुन्हा सापडला दुर्मीळ निळा खेकडा!

वॉशिंग्टन ः काही दिवसांपूर्वीच परदेशातील एका मच्छीमाराला चमकदार, निळ्या रंगाचा खेकडा सापडला होता व त्याने तो पुन्हा समुद्रात सोडून दिला. अर्थातच तत्पूर्वी त्याने या खेकड्याचा एक व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियात शेअर करणे विसरले नाही. आता एका बाप-लेकासही असा दुर्मीळ निळा खेकडा सापडला आहे. त्यांनी मात्र हा खेकडा पुन्हा समुद्रात न सोडता आपल्या रेस्टॉरंटमधील टँकमध्ये ठेवला आहे. असा खेकडा मिळणे ही वीस लाखांमध्ये एक इतक्याच शक्यतेचे आहे.

अमेरिकेत पोर्टलँडमध्ये या कुटुंबाचे रेस्टॉरंट आहे. मार्क रँड नावाच्या या गृहस्थाची पत्नी या रेस्टॉरंटचे काम सांभाळते. त्यांचा मुलगा ल्यूक याने सांगितले की पीक्स बेटाजवळील कॅस्को बे मध्ये हा खेकडा त्यांनी पकडला होता. ल्यूक रँड हे गेल्या वीस वर्षांपासून मासेमारी करतात व आपल्या वडिलांच्या नौकेवर त्यांना यासाठी मदत करतात. त्यांचे पिता मार्क लँड हे गेल्या 40 वर्षांपासून मासेमारी करतात. मात्र, असा निळा खेकडा त्यांना कधीही आढळला नव्हता. आता त्यांना जो खेकडा सापडला आहे तो एक नर खेकडा आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेन लॉबस्टर इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार असा खेकडा सापडण्याची शक्यता वीस लाखांत एक अशीच असते. एका विशिष्ट प्रकारच्या प्रोटिनच्या अत्याधिक प्रमाणामुळे खेकड्यात जनुकीय दोष निर्माण होऊन त्याला असा निळा रंग मिळतो.

Back to top button